देहलीकरांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ५३.८ टक्क्यांनी वाढ !
नवी देहली – या वर्षी सामाजिक माध्यमांवर खोटी ओळख सांगून देहलीकरांची फसवणून झालेल्या घटनांमध्ये ५३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातून स्वत:ची वैयक्तिक माहिती देणे धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत खोट्या नावाने खाती उघडल्याने फसवल्या गेलेल्या तक्रारींची संख्या १ सहस्र ७१७ होती, तर खाते हॅक झाल्याच्या विरोधातील तक्रारींची संख्या १ सहस्र ९७६ होती. हीच संख्या या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अनुक्रमे २ सहस्र ७२१ आणि २ सहस्र ९५९ राहिली. देहली पोलिसांनी संकलित केलेल्या माहितीवरून एका इंग्रजी वृत्तपत्राने ही आकडेवारी प्रसारित केली आहे.
विदेशी असल्याचे भासवून विविध आमिषे दाखवली !
देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रकरणांत आरोपींनी स्वत:ला विदेशी असल्याचे सांगणारे ‘प्रोफाइल’ बनवले आणि संबंधित पीडितांना जाळ्यात ओढून फसवले. त्यांच्याशी विवाह करण्याचे अथवा विदेशातून भेटवस्तू पाठवण्याचे आमीष दाखवण्यात आले. अशा प्रकरणात फसलेल्यांमध्ये महिला अधिक प्रमाणात होत्या.
सुरक्षायंत्रणांचे अधिकारी असल्याचा बनाव !
काही आरोपींनी सुरक्षायंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवत लोकांना फसवले. लोकांना ‘कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशा प्रकारे भीती दाखवून त्यांना स्वत:च्या जाळ्यात ओढले. बनावट संकेतस्थळे बनवून ‘चांगला पैसा मिळेल’, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले. पैसे मिळाल्यानंतर संबंधित संकेतस्थळ ‘डिलीट’ करून टाकण्यात आली.
वैयक्तिक माहिती चोरून ‘इन्स्टंट लोन’ घेतले !
सामाजिक माध्यमांवर लोकांची वैयक्तिक माहिती चोरून त्यांच्या नावाने कर्ज (इन्स्टंट लोन) घेतले.
विदेशात रहाणारे नातेवाईक असल्याचे भासवून फसवले !
काही प्रकरणात लोकांना भ्रमणभाष करून विदेशात रहाणारा नातेवाईक बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. पीडितांकडून छोटी रक्कम मागितली गेली, जेणेकरून त्यांना संशय येणार नाही.
आस्थापनेही फसली !
खोट्या ओळखी सांगून आस्थापनांनाही फसवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आस्थापनांतील अधिकार्यांना बनावट इ-मेल (फिशिंग इमेल) पाठवून त्यातून ‘व्यवसायातील भागीदार’ अथवा ‘वरिष्ठ अधिकारी’ असल्याचे भासवण्यात आले आणि पैशांची मागणी करण्यात आली. आस्थापनांनीही प्रत्यक्ष संबंधित वरिष्ठांना संपर्क न साधता इ-मेलवर विश्वास ठेवून संबंधित खात्यांवर पैसे पाठवण्यात आले.
फसवणुकीपासून सावधान रहाण्यासाठी हे करा !देहली पोलिसांनी सांगितले की, ज्यांना तुम्ही पैसे पाठवत आहात, त्यांची ओळख एकदा निश्चित करा. तुमची वैयक्तिक माहिती कुणालाही ‘शेअर’ करू नका. सामाजिक माध्यमांवरील तुमच्या ‘फ्रेंडलिस्ट’ला ‘लॉक’ ठेवा. तुमच्या खात्यांचा ‘पासवर्ड’ अधूनमधून पालटत रहा, तसेच ‘टू-स्टेप वेरिफिकेशन’चा उपयोग करा ! |