छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुणे विद्यापिठातील ‘संरक्षण आणि सामरिक विभागा’ची मान्यता !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात आता छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रम !

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर आता ‘पदव्युत्तर पदवी’ प्राप्त करता येणार आहे. महाराजांची शासनव्यवस्था, संरक्षण आणि सामरिक व्यवस्था यांचा विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह स्वराज्याच्या संदर्भातील संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘संरक्षण आणि सामरिक विभागा’ला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम चालू करण्यास अनुमती मिळाली आहे. राज्यात, तसेच संपूर्ण देशातच अशा प्रकारचा हा पहिला अभ्यासक्रम आहे. ‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या नावाने ओळखल्या जाणार्‍या या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.

 (सौजन्य : Zee 24 Taas)

विभागप्रमुख आणि विद्यापिठातील मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे गनिमी काव्यापासून सागरी सुरक्षेपर्यंत अनेक पैलू आहेत. वर्गातील अभ्यासक्रमासह गड-दुर्ग यांना प्रत्यक्ष भेटी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमावर आमचा भर असेल. सैन्यातील अधिकार्‍यांसह या विषयातील तज्ञ शिक्षक हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत.

या अभ्यासक्रमामुळे महाराजांच्या एकसूत्री राष्ट्राच्या बांधणीचा अभ्यास समोर येईल ! – लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर (निवृत्त)

लढायांच्या पलीकडे ‘एक कुशल प्रशासक’ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे कार्य आहे. स्वराज्यातील करप्रणाली, कृषीकर्ज आदींची माहिती लोकांना व्हायला हवी. स्वराज्य विस्ताराची दूरदृष्टी, सामरिक, संरक्षण आणि नौदल यांसंबंधीची महाराजांची दूरदृष्टी निश्चितच वाखाणण्याजोगी होती. या अभ्यासक्रमामुळे महाराजांच्या एकसूत्री राष्ट्राच्या बांधणीचा अभ्यास आणि माहिती समोर येईल, असे वाटते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वच अंगांनी अभ्यास व्हायला हवा ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वच अंगांनी अभ्यास व्हायला हवा. विद्यापिठातील संरक्षणशास्त्र विभागातील या अभ्यासक्रमामुळे निश्चितच महाराजांच्या युद्ध आणि सामरिक नीतीवर संशोधन होईल. इतिहासाच्या अंगानेही छत्रपतींचा अधिकाधिक अभ्यास होण्यासाठी विद्यापिठाने पुढाकार घ्यावा आणि या अभ्यासक्रमासाठी मराठी माणसांनी सर्वाधिक प्रवेश घ्यावा, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.