कामकाजात सुधारणा न झाल्यास कोकणसाठी महाराष्ट्र उठवणार ! –  मनसेचे नेते   

चिपळूण येथील उड्डाणपुलाची दुर्घटना !

दुर्लक्षामुळेच येथील उड्डाणपुलाची दुर्घटना घडली-मनसे

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना कसलेच गांभीर्य उरलेले नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच येथील उड्डाणपुलाची दुर्घटना घडली आहे. यापुढे कामकाजात सुधारणा न झाल्यास कोकणासाठी महाराष्ट्र उठवणार, अशी चेतावणी मनसे नेत्यांनी दिली. १९ ऑक्टोबरला सायंकाळी कार्यकारी अभियंत्यासमवेत मनसे नेत्यांची बैठक झाली.

त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर, संतोष नलावडे आणि अन्य मनसैनिक उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण का होत नाही ?-मनसे

मनसेच्या नेत्यानी म्हटले आहे की, गेल्या १७-१८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने त्याची इतिहासात नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इतके पूल, इतके कि.मी.चे रस्ते बांधले असे नेहमी सांगतात. यशाचे श्रेय तुम्ही घेता; मात्र अपयश कधी घेता का? हे तुमचेच अपयश आहे. कोट्यवधी रुपयांचा पूल कोसळतो, तेव्हा सरकारी अधिकारी, ठेकेदार कंपनी काय करत होती? या प्रकरणात नेमके दोषी कोण आहे ? यावर कुणीही बोलत नाही. यापुढील काळात या कामात सुधारणा न झाल्यास मनसैनिक शांत बसणार नाही.

यानंतर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, ‘‘येथील सुरळीत वाहतुकीसाठी २ दिवसांत ‘सर्व्हिस रोड’च्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. जोवर केंद्रीय समितीची पहाणी होत नाही, तोवर उड्डाणपुलाच्या कामास प्रारंभ करता येणार नाही.’’

रवींद्र चव्हाण

दोन दिवसांत संयुक्त बैठक – मंत्री रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पुढील २ दिवसांत मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.