‘कबीर कला मंच’ विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ करून जाळ्यात ओढते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती 

पत्रकार वार्तालापात पत्रकारांशी संवाद साधतांना १.श्री. रमेश शिंदे आणि उपस्थित पत्रकार

मिरज (जिल्हा सांगली), १७ ऑक्टोबर (वार्ता.) – पुणे येथील ‘कबीर कला मंच’ ही संस्था कबीराच्या गोष्टी सांगण्याच्या नावाखाली महाविद्यालयांतील मुलांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पुढे ही मुले कुठे जातात ? याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. या संदर्भात पुणे येथील २ पालकांनी ‘कबीर कला मंच’ येथे जाणारी आपली मुले बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे याविषयी पालकांनी जागृत राहून स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.

सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. या निमित्ताने १७ ऑक्टोबर या दिवशी येथील काशी विश्वेश्वर मंदिरासमोरील मारुति मठी येथे पत्रकारांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे चालू आहेत. देशाला नक्षलवाद्यांचा धोका आहेच, शिवाय गेल्या काही वर्षांपासून देशाला अर्बन नक्षलवाद्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वप्रथम जे.एन्.यू.मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. मुळात जे.एन्.यू.मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देशविरोधी कारवाया अथवा घोषणा देण्यास कोण सांगते ? त्या मुख्य सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे. कुणीतरी सांगितल्यानंतरच ‘जे.एन्.यू.’चे विद्यार्थी कन्हैैयालाल आणि उमर खालिद यांनी देशविरोधी घोषणा दिल्या आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर देशातील काही कट्टरवादी इस्लामी संघटना ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने उभे रहाण्याचे आवाहन करत आहेत. भारताने ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने उभे रहाण्याची धर्मांध ‘एस्.डी.पी.आय.’ने राष्ट्रघातकी मागणी केली आहे. त्यामुळे हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वतःच्या रक्षणार्थ सिद्ध झाले पाहिजे.’’