अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी झेलेंस्की यांना फटकारले !

युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे निधी मागितल्याचे प्रकरण !

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

वॉशिंग्टन – युक्रेनमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी अमेरिकेने साहाय्यता निधी द्यावा, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे केली  आहे. या सूत्रावरून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी झेलेंस्की यांना फटकारले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलो, तर युक्रेनला दिल्या जाणार्‍या आर्थिक साहाय्यतेत कपात करणार’, असे वक्तव्य रामास्वामी यांनी केले आहे.

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी म्हणाले की, आपण अमेरिकी लोकांना सत्य सांगितले पाहिजे. पुतिन हे एक दुष्ट हुकूमशहा आहेच; मात्र याचा अर्थ असा नाही की, युक्रेन चांगला आहे. युक्रेन असा देश आहे जिथे ११ विरोधी पक्षांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच तेथील सर्व प्रसारमाध्यमे एका सरकारी माध्यमात विलीन करण्यात आली आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकतेच एका नाझीचे कौतुक केले होते.