सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !  

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मुंबई येथील राज्यस्तरीय बैठकीत प्रस्ताव !

डावीकडून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, जी.एस्.बी. टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे

मुंबई – सनातन धर्माला नष्ट करण्याविषयी द्वेषमूलक वक्तव्ये करणारे द्रमुकचे मंत्री  उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा, काँग्रेसचे प्रियांक खर्गे अन् पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात तातडीने गुन्हे नोंदवून कारवाई व्हावी, असा प्रस्ताव ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या दादर, मुंबई येथे झालेल्या तिसर्‍या राज्यस्तरीय बैठकीत पारित करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प.) येथे ३० सप्टेंबर या दिवशी झालेल्या या बैठकीला राज्यातील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. जी.एस्.बी.टेंपल ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी बैठकीच्या आरंभी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मागील ६ मासांत झालेले उपक्रम, आंदोलने आणि त्यात मिळालेले यश यांविषयी सर्वांना माहिती दिली. या वेळी राज्यातील मंदिर विश्‍वस्तांनीही ६ मासांमध्ये केलेल्या कार्याचा आढावा मांडला.

मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – सुनील घनवट

‘मंदिरे ही सनातन धर्मप्रसाराची केंद्रे आहेत. आज महाराष्ट्रात १७५ हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू केली आहे. याविषयीचे प्रयत्न अजून वाढवून ही राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली पाहिजे. ‘हिंदूंची मंदिरे सरकारमुक्त करणे, तसेच वक्फ बोर्डाच्या मंदिरांच्या भूमी बळकावणाच्या षड्यंत्राविषयी जागृती होण्यासाठी राज्यभर मंदिर विश्‍वस्तांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत’, असे आवाहनही श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केले.

मंदिरांच्या परंपरांपर होणारे आघात रोखण्यासाठी संघटितपणे लढणे, सरकारीकरण देवस्थानांतून मोठ्या प्रमाणावर होत असलेली भक्तांची लूट थांबवण्यासाठी जलद पावले उचलणे यासाठी एकत्रितपणे कृती करण्याचा निर्धार बैठकीला उपस्थित विविध मंदिरांचे विश्‍वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमुख प्रतिनिधींनी यांनी केला.

बैठकीत उपस्थित महनीय व्यक्ती

बैठकीला उपस्थित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमुख प्रतिनिधी

या बैठकीत जी.एस्.बी. टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे, सचिव श्री. शशांक गुळगुळे, श्रीक्षेत्र थेऊर देवस्थान, सिद्धटेक देवस्थान; मोरया गोसावी देवस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. आनंद महाराज तांबे, अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर महाले, विदर्भ देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. अनुप जयस्वाल, नगर येथील श्री अंबिका तुळजाभवानीमाता मंदिराचे अधिवक्ता अभिषेक भगत, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे अधिवक्ता शिरीष कुळकर्णी, आणि पुजारी आणि माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे; पाली येथील बल्लाळेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गद्रे आणि व्यवस्थापक श्री. चंद्रशेखर सोमण; महड येथील श्री गणपति संस्थानच्या अध्यक्षा सौ. मोहिनी वैद्य; विरार (जि. पालघर) येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर; पनवेल येथील श्री श्‍वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन; कडाव (कर्जत) येथील गणपति मारुती देवस्थानचे विश्‍वस्त श्री. विनायक उपाध्ये, अमरावती येथील पिंगळादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. विनीत पाखोडे; लक्ष्मीनारायण संस्थानचे श्री. अशोक खंडेलवाल; हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवरांसह विविध मंदिरांचे विश्‍वस्त उपस्थित होते.

बैठकीत पुढील उपक्रमांविषयी चर्चा

या बैठकीत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची रचना आणि कार्यकारिणी तसेच महासंघाच्या वतीने राज्यभर पुढील ३ मासांत घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी ठरवण्यात आले. राज्यात अनेक मंदिरांच्या समस्या आहेत. त्या सोडवून मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क करावा’, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.