एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

छत्रपती संभाजीनगर येथील गणेशोत्‍सव मंडळांवर गुन्‍हे नोंद करण्‍यावरून मनसे आक्रमक !

(डीजे म्‍हणजे (डिस्‍क जॉकी) एक व्‍यक्‍ती वेगवेगळ्‍या संगीतांचे मिश्रण करून त्‍याचे प्रसारण करतो.)

मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष सुमित खांबेकर

छत्रपती संभाजीनगर – गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत. उच्‍च न्‍यायालयाने ठरवून दिलेल्‍या डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने ध्‍वनीक्षेपक वाजवल्‍यामुळे ही कारवाई केली आहे, असे पोलिसांच्‍या विशेष शाखेने सांगितले; मात्र गणेशोत्‍सव मंडळांवर गुन्‍हे नोंद झाल्‍याने मनसेनेे तीव्र शब्‍दांत याचा विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने क्रांती चौक येथे रस्‍ता बंद करून एका कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजात ध्‍वनीक्षेपक लावले होते, तेव्‍हा महापालिकेवर गुन्‍हा नोंद झाला का ?, असा प्रश्‍न मनसेने विचारला आहे.

मनसेने ‘गणेशोत्‍सव मंडळांवरील गुन्‍हे मागे घ्‍यावेत’, अशी मागणी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली आहे. ‘हिंदु धर्माच्‍या नावाने राजकारण करणार्‍यांनी हिंदु धर्मातील सणांवर निर्बंध लावले आहेत’, अशी टीकाही मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष सुमित खांबेकर यांनी केली. ‘राज्‍य सरकारने ‘निर्बंधमुक्‍त गणेशोत्‍सव’ अशी घोषणा केली होती. त्‍याचा अर्थ सरकारने स्‍पष्‍ट करावा’, असेही त्‍यांनी म्‍हटले. पोलीस आयुक्‍त मनोज लोहिया यांनी ‘डीजे’वरील कारवाईसाठी विशेष पथकाची स्‍थापना केली आहे. शहरातील १८ पोलीस ठाण्‍यांच्‍या क्षेत्रातील पोलिसांना ध्‍वनीप्रदूषणाचे मोजमाप करण्‍यासाठी १८ यंत्रे दिली आहेत. पोलीस आयुक्‍तालयाच्‍या क्षेत्रात अनुमाने ९०० गणेशोत्‍सव मंडळे आहेत. या सर्वांवर पोलिसांची करडी दृष्‍टी आहे.