सातारा, २८ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा नगर परिषदेच्या वतीने वर्ष २०२३-२४ चे करदेयक वितरित करण्यात आले आहे. या कर देयकामध्ये ‘उपयोगकर्ता शुल्क’ म्हणून नवीन कर आकारणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सातारा नगर परिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाल संपून दीड वर्ष होऊन गेले. या कालावधित प्रशासक म्हणून मुख्याधिकारी सातारा नगर परिषदेचा कारभार पहात आहेत. यावर्षी नवीनच ‘उपयोगकर्ता शुल्क’ सातारावासियांकडून आकारण्यात येत आहे. काही सूज्ञ नागरिकांनी याविषयी नगर परिषदेमध्ये करवसुली विभागात विचारणा केली; मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा नगर परिषदेच्या वतीने नव्याने लावण्यात आलेले ‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नव्याने सीमावाढ झालेल्या आणि समस्त सातारावासियांना विश्वासात न घेता आकारण्यात आलेले आहे. हा कर तात्काळ मागे घेण्यात यावा. तसेच कोविड संसर्गामुळे त्या २ वर्षांत नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. याविषयी नगर विकास विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय व्हावा, अशी सातारावासियांची अपेक्षा आहे. – श्री. जितेंद्र वाडेकर, माजी शहरमंत्री, विश्व हिंदु परिषद, सातारा |