(म्हणे) ‘भविष्यातील भारतात हिंदु धर्म नसेल !’ – आयआयटी देहलीच्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी

आयआयटी देहलीच्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी यांचा हास्यास्पद शोध !

आयआयटी देहलीच्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी

नवी देहली – एक भूतकाळातील भारत होता, ज्यामध्ये जातव्यवस्थेच्या आधारे मोठ्या प्रमाणात लोकांवर अत्याचार आणि दडपशाही करण्यात आली. एक भविष्यातील भारत असेल, ज्यामध्ये जातीव्यवस्थेच्या आधारे होणारा भेदभाव नसेल आणि हिंदु धर्मही नसेल, असे विधान ‘आयआयटी देहली’च्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यांनी ‘जी-२०’ परिषदेत फ्रान्सच्या एका वाहिनीला मुलाखत देतांना हे विधान केले होते. यापूर्वी दिव्या द्विवेदी यांनी ‘हिंदु धर्म खोटा धर्म असून, तो २० व्या शतकाच्या प्रारंभी बनवण्यात आला आहे’, असे म्हटले होते. (कोण खोटे आहे, हेच अशा विधानांतून लक्षात येते ! – संपादक)

दिव्या द्विवेदी व्हिडिओत पुढे म्हणतात की, सध्या ‘आर्यन मानसिकता’ असणारा भारत जगासमोर मांडणे चालू आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावावर भर दिला जात आहे. भविष्यातील ‘हिंदु-विरहित भारत’ अद्याप जगासमोर मांडला जात नाही. गेल्या ३०० वर्षांहून अधिक काळ जातीव्यवस्था भारताला आकार देत आहे. देशात १० टक्के सवर्ण आहेत; मात्र तेच देशातील ९० टक्के शक्तीशाली आणि लाभ यांच्या पदांवर विराजमान आहेत. हेच आजही चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्म सनातन धर्म आहे. त्याच्यावर सहस्रो वर्षांमध्ये अनेक आघात झाले, अनेकांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते स्वतः नष्ट झाले आणि सनातन धर्म तसाच राहिला. त्यामुळे अशी विधाने करणारे त्यांच्या बुद्धीची धाव कुठपर्यंत आहे, हेच दाखवून देत आहेत !
  • अशा द्वेषी प्राध्यापिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !