(म्हणे) ‘घोषणापत्रात गर्व करण्यासारखे काही नाही !’ – युक्रेन

जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने  युक्रेनची टीका

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (डावीकडे) युक्रेन चे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की (उजवीकडे)

कीव (युक्रेन) – भारताच्या अध्यक्षतेखाली नवी देहलीत आयोजित ‘जी-२०’ परिषदेमध्ये भारताने अत्यंत मुत्सद्दीपणा दाखवत संयुक्त घोषणापत्र प्रसारित केले. यात युक्रेन युद्धाचा उल्लेख करतांना रशियाच्या नावाचा उल्लेख टाळला. याला ‘जी-२०’च्या सर्व देशांनी मान्यता दिली. आता यावरून युक्रेनने टीका केली आहे. या परिषदेसाठी युक्रेनला भारताने आमंत्रित केले नव्हते. त्यामुळेही युक्रेन अप्रसन्न होता.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ओलेग निकोलेंको यांनी फेसबुकवर लिहिले, ‘घोषणापत्रात गर्व करण्यासारखे काहीच नाही. जर युक्रेन या परिषदेत उपस्थित असता, तर परिषदेच्या सदस्यांनी त्यांची स्थिती अधिक समजली असती.’ ओलेग यांनी या वेळी परिषदेमध्ये युक्रेनची बाजू मांडणार्‍या देशांचा आभारही व्यक्त केला. फ्रान्ससमवेत युरोपमधील काही देशांना घोषणापत्रातील युक्रेन युद्धाच्या संदर्भातील भाषेविषयी आक्षेप होता.

संपादकीय भूमिका

युक्रेनने काश्मीरच्या प्रश्‍नावर नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेत पाकिस्तानला साहाय्य केले आहे. याविषयी भारताने कधी काही म्हटलेले नाही, याचा युक्रेनने विचार केला पाहिजे ! जेव्हा स्वतःचे घर जळते तेव्हा दुसर्‍याचे दुःख लक्षात येते; मात्र युक्रेनने अद्यापही काश्मीर प्रश्‍नावर भारताची बाजू घेतलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !