शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत ! – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

वाघनखांशेजारी उभारला जाणार अफजलखानवधाचा देखावा !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे मुंबईत आणली जाणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखे परत आणण्यात येणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. ही वाघनखे सर्वांना पहाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ही वाघनखे ठेवण्यात येतील, तेथे अफजलखानाच्या वधाचा देखावा उभारण्यात येईल.’’

वाघनखांविषयी या आहेत अटी !

‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयासमवेत केलेल्या करारामध्ये ‘वाघनखे संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत’, ‘वाघनखांचा विमा उतरवण्यात यावा’, ‘वाघनखांच्या सुरक्षेसंबंधी काय उपाययोजना करण्यात येणार त्याविषयी सांगावे, तसेच त्यांच्या सुरक्षेची योग्य ते दायित्व घ्यावे’ ती काळजी घ्यावी’ या अटी घालण्यात आल्या असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘जगदंबा’ तलवार वर्ष २०२४ पर्यंत महाराष्ट्रात आणणार !

‘जगदंबा’ तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजेची तलवार असल्याची  इतिहासात नोंद आहे. ही तलवार सध्या ब्रिटनमध्ये आहे. वर्ष २०२४ पर्यंत ही तलवार महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी केंद्रशासनाद्वारे ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे, असे या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.