मतभेद नसल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा इंडिया आघाडीचा विश्‍वास !

मुंबई – विरोधी पक्षांत अंतर्गत कोणताही मतभेद नसल्याचे सांगत ‘इंडिया आघाडी’मध्ये एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वर्ष २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा विश्‍वास व्यक्त केला. या बैठकीला काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, नवी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आदी नेते उपस्थित होते.

देशाला भयमुक्त करणार ! – उद्धव ठाकरे

आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढू. देशाला भयमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

भारताच्या विकासासाठी एकत्र ! – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

इंडिया आघाडी ही १४० लोकांचे संघटन आहे. २१ व्या शतकातील भारताची निर्मिती करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत स्थापन झालेल्या सरकारमध्ये मोदी सरकार हे सर्वांत भ्रष्ट आहे. भारत सरकार एका व्यक्तीसाठी काम करत आहे. हे सरकार स्वत:ला देवापेक्षा श्रेष्ठ समजत आहे. अशा वेळी पतन लवकर होते. आम्ही पदासाठी नव्हे, तर भारताच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.

आम्ही मोदी यांना हटवूच ! – लालूप्रसाद यादव

भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशात महागाई वाढत आहे. आम्ही एकत्र नसल्याचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाला. खोटे बोलून आणि अफवा पसरवून हे लोक सत्तेत आले. ‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्‍वासन देणार्‍यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.

एकत्रित निवडणूक लढवली, तर भाजपला सहज पराभूत करू ! – राहुल गांधी

इंडिया आघाडीमधील जागांचा प्रश्‍न लवकरच चर्चा करून आम्ही सोडवणार आहोत. भाजप गरिबांकडून पैसा घेऊन श्रीमंतांना देत आहे. इंडिया आघाडीमधील नेते देशातील ६० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतात. आम्हा सर्व नेत्यांमध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण होत आहे. एकत्रित निवडणूक लढवली, तर आम्ही भाजपला सहज पराभूत करू.

चुकीच्या मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणू ! – शरद पवार

सत्ता आणि अधिकार हातात आल्यावर भाजपच्या नेत्यांचे पाय भूमीवर राहिलेले नाहीत. भाजपचे सध्याचे नेते गर्विष्ठ असल्याचे वरिष्ठ नेते म्हणत आहेत. आम्ही थांबणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणार्‍यांना आम्ही सरळ मार्गावर आणू.