बिहारमधील शाळांमध्ये रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या रहित !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार सरकारने सरकारी शाळांना देण्यात येणार्‍या सुट्ट्यांमध्ये कपात केली आहे. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के. पाठक यांनी काढलेल्या आदेशात रक्षाबंधन, हरितालिका, जिऊतिया, विश्‍वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गुरु नानक जयंती या सणांना सुटी नसेल, असे म्हटले आहे. भाजपने यावर टीका केली आहे.

१. बिहारमध्ये २८ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत सरकारी शाळांनाअनुमाने २३ सुट्ट्या होत्या, त्या अल्प करून ११ करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दिवाळीपासून छठपूजेपर्यंत सलग सुट्ट्या होत्या. आता दिवाळी, चित्रगुप्त पूजा (भाऊबीज) आणि छठसाठी २ दिवस सुटी असेल.

२. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, हक्क कायदा २००९ अंतर्गत, प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते ५ वी) किमान २०० दिवस, माध्यमिक शाळांमध्ये (इयत्ता ६ वी ते ८ वी) किमान २२० दिवस कार्यरत असणे आवश्यक आहे.

३. माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणाले की, निवडणुका, परीक्षा, सण, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे शाळांमधील शिक्षणावर परिणाम होतो. सणाांच्या निमित्ताने शाळा बंद ठेवण्याच्या प्रक्रियेतही एकसूत्रता नाही. काही सणांच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये शाळा चालू असतात, तर काहींमध्ये बंद असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने आता केलेला पालट वर्ष २०२३ च्या उर्वरित दिवसांसाठी केवळ शाळांच्या कामकाजात एकसमानता राखण्यासाठी करण्यात आला आहे.

बिहारमध्ये शरीयतही लागू होईल ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची टीका

भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, बिहार सरकारने नवरात्रातील दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजा यांच्या सुट्या अल्प केल्या आहेत. उद्या बिहारमध्ये शरीयतही लागू होईल, तसेच हिंदु सण साजरे करण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप न केल्यास न्यायालयात जाऊ ! – प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षण विभागाच्या या आदेशानंतर शिक्षकही संतप्त झाले आहेत. टी.ई.टी. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयोजक राजू सिंह म्हणाले की, सर्व नियम आणि अटी लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. अशा सूचनांद्वारे शिक्षकांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास शिक्षक न्यायालयात दाद मागतील.

संपादकीय भूमिका

बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !