प्रशासनाने दुर्गापूजेवर घातलेली बंदी कोलकाता उच्च  न्यायालयाने उठवली

कोलकाता – दुर्गापूजा ही कोलकाता शहरासाठी धार्मिक प्रतीकापेक्षा सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयाने दुर्गापूजा मंडप उभारण्यावर घातलेली बंदी उठवली. प्रशासकीय अधिकार्‍यांनी न्यू टाऊन मेळा मैदानावर मंडप उभारण्यासाठी अनुमती नाकारल्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. घटनेतील कलम १४ च्या अंतर्गत हे आव्हान देण्यात आले होते.

याविषयी निकाल देतांना न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, ‘‘दुर्गापूजेचा उत्सव हा अनेक संस्कृतींच्या संमेलनासारखा आहे. हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. या उत्सवात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये सर्व समाजातील लोक सहभागी होतात.’’

उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. (यावरून प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते, असे नागरिकांना वाटल्यास ते चुकीचे कसे ? – संपादक)