२१ व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करेल ! – पंतप्रधान

इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करतांना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला !

पंतप्रधान मोदी

बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान मोदी इस्रोच्या यशाविषयी बोलतांना भावुक झाले. या वेळी त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करतांना म्हटले की, असे प्रसंग पुष्कळ दुर्मिळ असतात. तुम्हा सर्वांमध्ये येऊन आज मला वेगळाच आनंद होत आहे. आज भल्या सकाळीच मी इस्रोच्या कार्यालयात वैज्ञानिकांची भेट घेण्यासाठी आल्यामुळे तुम्हा सर्वांची अडचण झाली एल; पण भारतात परतताच मला लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी यायचे होते. हे म्हणत असतांना मोदी यांचा कंठ दाटून आला. पंतप्रधान म्हणाले की,  तुमचे श्रम, धैर्य, निष्ठा आणि पराक्रम यांना माझा ‘सलाम’ आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, तुमचे यश साधे नाही. अंतराळात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे. भारत चंद्रावर पोचला आहे. जिथे आतापर्यंत कुणीही पोचू शकले नव्हते, तिथे आपण पोचलो आहोत. आपण ते केले, जे आधी कुणी कधीही केलेले नव्हते. २१ व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करेल, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला.