न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून उत्तर गोव्यात ‘रेव्ह पार्ट्यां’द्वारे ध्वनीप्रदूषण

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ‘रेव्ह पार्ट्या’ आयोजित करून ध्वनीप्रदूषण !

पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – उत्तर गोव्यात मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ‘रेव्ह पार्ट्या’ आयोजित करून त्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण करण्यात आले. ध्वनीप्रदूषण सूत्रावरून न्यायालयाने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना ध्वनीप्रदूषणासंबंधी सर्व नियम, कृती योजना आणि ध्वनीप्रदूषणाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश यांचे पालन करण्याचे निर्देश हल्लीच दिले होते; मात्र हणजूण आणि आसपासचा परिसर येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत २० हून अधिक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या पार्ट्या रात्री १० वाजल्यानंतर बंद करणे आवश्यक असतांनाही त्या रात्रभर चालू होत्या. यातील अनेक पार्ट्या रात्री ९ वाजता चालू झाल्या. अनेक पार्ट्यांमध्ये विदेशी ‘डिजे’चा (डिजे म्हणजे मोठ्या आवाजातील संगीत) सहभाग होता. सामाजिक माध्यमांत विज्ञापने प्रसारित करून या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. मोरजी येथे १२ आणि १३ ऑगस्ट या दिवशी ‘मोरजी म्युझिक फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर झालेल्या या कार्यक्रमाच्या विज्ञापनात कार्यक्रम रात्री १० वाजता चालू होणार असल्याचे म्हटले होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाळे ठोकलेल्या हॉटेल्सकडून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पार्ट्यांचे आयोजन झाल्याचा आरोप

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘द एअर अँड वॉटर ॲक्ट’ अंतर्गत ३ क्लबना टाळे ठोकले होते; मात्र या क्लबने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पार्ट्यांचे आयोजन केल्याचा आरोप आहे. पार्ट्यांविषयी सामाजिक माध्यमांत विज्ञापन प्रसारित करून या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १३ ऑगस्टपर्यंत या ठिकाणी रात्री १० वाजल्यानंतरही पार्ट्यांचे आयोजन केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताच्या आधारावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकार्‍यांना याविषयी माहिती दिली, तसेच मंडळाने १४ ऑगस्ट या दिवशी सकाळी त्यांचा एक गट निरीक्षणासाठी पाठवला. मंडळाच्या शिष्टमंडळाने तेथील छायाचित्रे घेतली आहेत आणि या भागाला लावलेले टाळे कायम असल्याचा मंडळाचा दावा आहे. मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या मते, ‘हॉटेलला टाळे ठोकलेले असतांना कुणीही आत प्रवेश कसा करू शकतो ? याविषयी शासनाकडे अहवाल मागितला आहे.’’

संपादकीय भूमिका

  • पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ?
  • गोवा पोलिसांनी अनेक प्रकरणांत चांगली कामगिरी केली आहे; पण समुद्रकिनार्‍यांवरील प्रदूषण रोखण्याविषयी पोलिसांची उदासीनता दिसून येते. याचे कारण एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.