जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कार्यरत १०९ जिहादी आतंकवाद्यांपैकी ७१ जण पाकिस्तानी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या १०७ आतंकवादी कार्यरत असून त्यांतील तब्बल ७१ जण हे पाकमधील आहेत, तर उर्वरित ३८ हे जम्मू-काश्मीरचेच रहिवासी आहेत, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सैन्याने राबवलेल्या शोधमोहिमांच्या वेळी उडालेल्या चकमकीत अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. गेल्या वर्षी १८७ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर या वर्षी २० जुलैपर्यंत ३५ आतंकवाद्यांना चकमकीमध्ये ठार करण्यात आले आहे.

गेल्या ५ वर्षांत ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची संख्या !

शरण आलेल्या आतंकवाद्यांची संख्या अत्यल्प का ?

जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्यातील अधिकारी यांनी माहिती दिली आहे की, स्थानिक रहिवाशांपैकी जे युवक ‘आतंकवादी’ म्हणून आतंकवादी संघटनेत सहभागी होतात, त्यांच्यापैकी अत्यल्प जणच सैन्याला शरण येतात. गेल्या ५ वर्षांची आकडेवारी पाहिली, तर ही संख्या केवळ १३ आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, जेव्हा एखादा काश्मिरी युवक गायब होतो, तेव्हा पोलीस आणि त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊ लागतात. साधारण ३-४ आठवड्यांनी आतंकवादी संघटना त्या युवकांच्या हातात शस्त्रे असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांत प्रसारित करतात. यावरून सुरक्षायंत्रणा त्या तरुणांना ‘आतंकवादी’ म्हणून घोषित करतात.

याचा दुहेरी शस्त्र म्हणून आतंकवादी लाभ उठवतात. जर एखाद्या युवकाला पुन्हा मुख्य प्रवाहात जायची इच्छा झाली, तर अशांची शस्त्रांसहित काढलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्राधान्याने प्रसारित केली जातात. त्यामुळे सैन्य त्यांना आतंकवादी  घोषित करते. साहजिकच अशा युवकांना मुख्य प्रवाहात येता येत नाही. आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग घेण्यास त्यांना भाग पाडले जाते. यामुळेच गेल्या ५ वर्षांत अत्यल्प तरुण आतंकवादी संघटना सोडून परत आले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या भर्तीचे वर्षनिहाय आकडे !

जम्मू-काश्मीरमध्ये ‘हायब्रिड’ आतंकवाद्यांचे वाढते संकट !

सुरक्षादलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने माहिती दिली की, सध्या राज्यात १०९ आतंकवादी सक्रीय आहेत. त्यांच्यापैकी ३८ स्थानिक आणि ७१ विदेशी आतंकवादी आहेत. इतक्यात घुसखोरीची मोठी घटना घडलेली नाही. सध्या हे आतंकवादी कुठे लपले आहेत, याचा शोध घेतला जात आहे; परंतु पाकिस्तानातील आतंकवादी संघटना ‘हायब्रिड’ आतंकवादी सिद्ध करत आहेत. ‘हायब्रिड’ आतंकवादी म्हणजे भूमीगत असलेले जिहादी. ते उघड आतंकवादी कारवाया करत नसल्यामुळे स्थानिक जनता आणि पोलीस यांना त्यांचा संशय येत नाही.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?