पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पायउतार होण्यामागे अमेरिकेचे षड्यंत्र !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुकही अमेरिकेला रुचले नाही !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आली असून पुढील ९० दिवसांत तेथे निवडणुका होणार आहेत. अशातच पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होण्यामागे अमेरिका असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी इम्रान खान रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रारंभीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे भरपूर कौतुक करत होते. तसेच तेल खरेदी करण्यासाठी त्यांनी रशियामध्ये पुतिन यांची भेटही घेतली होती. या गोष्टी अमेरिकेला रुचल्या नाहीत. युद्धाच्या दबावात असलेल्या अमेरिकेने खेळी करत इम्रान खान यांना पायउतार होण्याचे षड्यंत्र रचले, अशी माहिती समोर आली आहे.


‘अल्-जजीरा’ या वृत्तसंकेतस्थळानुसार अमेरिकेतील एका वृत्तपत्राने हा दावा केला आहे. यासाठी अमेरिका आणि पाक या देशांतील अधिकार्‍यांचा संवेदनशील संवाद उघड झाल्याचे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे.

१. अमेरिकी दबावामुळेच इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली, तसेच संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले, असे अल्-जजीराचे म्हणणे आहे.

२. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये पाकिस्तानने तटस्थतेची भूमिका स्वीकारली असली, तरी ती तटस्थ दिसत नव्हती, असे अमेरिकी अधिकार्‍यांनी पाकिस्तानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना लक्षात आणून दिले होते.

३. एकूणच त्या कालावधीत इम्रान खान यांच्या विरोधातील पाकिस्तानी संसदेतील अविश्‍वास ठरावाला अमेरिकेने पुष्कळ बळ दिले.

४. इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू सरकारी निजोरीत जमा केल्याच्या प्रकरणात घोटाळा केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, तसेच त्यांना निवडणुका लढण्यावर प्रतिबंध लादण्यात आला. कारागृहात असतांना माजी पंतप्रधान म्हणून कोणत्याही विशेष सुविधासुद्धा त्यांना मिळाल्या नाहीत. त्यांचा ‘पीटीआय’ पक्ष एक प्रकारे नष्टच करण्यात आला.