पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर

मिरज, ६ ऑगस्‍ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे देशविकासाची दृष्‍टी असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारत जागतिक स्‍तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्‍यासाठी सक्षम नेतृत्‍व हवे असल्‍याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील, असा विश्‍वास ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्‍यक्‍त केला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचे पुरस्‍कर्ते आणि अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी ‘महाराष्‍ट्रातील सद्य राजकीय परिस्‍थिती’ यावर ज्‍येष्‍ठ राजकीय विश्‍लेषक श्री. तोरसेकर, श्री. सुशील कुलकर्णी आणि श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांची मुलाखत बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ५ ऑगस्‍ट या दिवशी घेतली. त्‍या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी श्री. भाऊ तोरसेकर लिखित ‘कोरी पाटी’ या पुस्‍तकाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

श्री. भाऊ तोरसेकर म्‍हणाले

१. ‘डॉ. आंबेडकर यांची घटना आम्‍ही पालटू देणार नाही’, असा कंठशोष डावे आणि पुरोगामी करतात; मात्र घटनेत पालट करता यावा म्‍हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनादुरुस्‍तीचे कलम ठेवलेले आहे, याकडे ते सोयीस्‍कर दुर्लक्ष करतात.

२. पू. भिडेगुरुजी यांच्‍या संदर्भात काँग्रेसींनी गदारोळ उठवला आहे; मात्र या प्रकरणामुळे अनेकांमध्‍ये ‘पू. भिडेगुरुजी कोण ?’ याविषयी जिज्ञासा निर्माण होत आहे.

या वेळी शरद पोंक्षे म्‍हणाले

१. स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु महासभेचे अध्‍यक्ष असतांना स्‍वातंत्र्यापूर्वी काही वर्षे स्‍वतंत्र भारताची राज्‍यघटना बनवण्‍यात आली होती. ही राज्‍यघटना आताच्‍या राज्‍यघटनेशी ९० टक्‍के जुळते.

२. पू. भिडेगुरुजी यांचे पूर्ण भाषण न दाखवता त्‍यातील ठराविक भाग दाखवण्‍यात आला. या प्रकरणाचे सरकार सखोल अन्‍वेषण करत असून यापुढील काळात सत्‍य-असत्‍य बाहेर येईल.

कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय

श्री. सुशील कुलकर्णी म्‍हणाले

१. आता माझ्‍यासारख्‍या आणखी काही जणांना एकत्र करून ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन’ यांसारखा मोठा ‘प्‍लटफॉर्म’ (सामाजिक माध्‍यम) चालू करायचे आहे. ते असे माध्‍यम असेल की, कोणत्‍याही परिस्‍थितीत ते बंद पडणार नाही आणि ज्‍यावर हिंदुत्‍व, राष्‍ट्रीयत्‍व, तसेच हिंदूंवर होणार्‍या आघातांना वाचा फोडता येईल. त्‍यासाठी हिंदूंनी तांत्रिक साहाय्‍य करावे.

२. आम्‍ही सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ राष्‍ट्रीय विचारधारा असलेले असून आमची शक्‍ती आम्‍ही राष्‍ट्राला अर्पित करण्‍याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी नव्‍या भारताचा राष्‍ट्रपिता मानतो.

श्री भाऊ तोरसेकर म्‍हणाले

१. डावे आणि पुरोगामी यांपैकी कुणीही शाहू-फुले-डॉ. आंबेडकर यांची नेमकी विचारसरणी काय आहे ते जाणून घेतलेले नाही. ते ‘शाहू-फुले-डॉ. आंबेडकर’ यांच्‍या विचारधारेला चवीपुरते वापरतात. उलट त्‍यांच्‍या विचारांची अपकिर्ती यांच्‍याइतकी कुणी केलेली नाही.

२. कोरोना काळात लोकांना धीर देण्‍यासाठी चालू केलेले प्रतिपक्ष आज प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. प्रतिपक्षच्‍या माध्‍यमातून मी लोकांना राजकारणाकडे, राजकीय घटनांकडे कसे पहायचे ते शिकवले.

३. लोकशाहीत अनेक लढाया या रणनितीनुसार लढल्‍या जातात. ही रणनिती कुणी समजावून सांगत नाही. कधीकधी त्‍या ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ झाल्‍यावर कळतात.

श्री. प्रभाकर सूर्यवंशी म्‍हणाले

१. मी अगोदर हिंदू आहे, मग मी पत्रकार आहे.

विशेष

  • श्री. संजय धामणगावकर आणि त्‍यांच्‍या सहकार्‍यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेली ही पहिलीच वैशिष्‍ट्यपूर्ण मुलाखत होती. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरल्‍याने बाहेर ‘स्‍क्रीन’ लावून नागरिकांना कार्यक्रम पहाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.
  • आपल्‍या अत्‍यंत अभ्‍यासपूर्ण मुलाखतीत श्री. भाऊ तोरसेकर यांनी प्राचीन काळापासून ते आतापर्यंतचे अनेक दाखले देत लोकांना विचारांची शिदोरीही दिली.