मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

  • भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत चेतावणी

  • लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांविरोधातील कायदे करण्याचीही मागणी !

प्रसाद लाड

मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत. मशिदींवरील भोंगे बंद न केल्यास हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा, गणपति आणि श्रीराम देवतांची आरती करावी लागेल, अशी चेतावणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत केले. विधान परिषद नियम २६० अन्वये राज्यातील ‘कायदा आणि सुव्यवस्था’ या प्रस्तावावर ते बोलत होते. यासह त्यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी यांविरोधातील कायदेही करण्याची मागणी या वेळी केली.

सौजन्य झी 24 तास 

आमदार प्रसाद लाड पुढे म्हणाले की,

१. राज्यात औरंगजेबाचे छायाचित्र दाखवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दंगलीची स्थिती निर्माण केली जात आहे. यापूर्वी पालघर येथे साधूंचे हत्याकांड झाले आहे.

२. देशात गेल्या ३ वर्षांत देशातून १३ लाख महिला आणि मुली बेपत्ता झाल्या असून त्या कुठे जात आहेत ? कशा प्रकारे लव्ह जिहाद केला जात आहे ? यांचा कुणालाही थांगपत्ता नाही.

३. राहुरी (जिल्हा नगर) येथील हिंदु मुलींच्या धर्मांतराचा प्रश्‍न मांडल्यानंतर तेथील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. २ मुली तक्रार करायला गेल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या पालकांना रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेतले होते. तरीही गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंद केले गेले नाहीत. तेथे १३ हिंदु मुलांविरुद्ध विनाकारण गुन्हे नोंद करून त्यांना अटकही केली जाते; मात्र गुन्हेगारांना अटक केली जात नाही.

४. हिंदु मुली आणि महिला यांना फसवून आणि त्यांच्याशी विवाह करून धर्मांतर केले जात असून त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. लव्ह जिहादसाठी अर्थसाहाय्य कुठून केले जाते ? त्याचा शोध घेतला पाहिजे.

५. श्रीरामपूर येथे लव्ह जिहादची घटना घडल्यानंतर तेथे आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे. त्यामुळे लव्ह जिहादविरोेधी कायदा करणे आवश्यक आहे.

६. ‘मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याने भोंग्यावर बंदी आणावी’, अशी  मागणी केली जात आहे. मशिदींवरील भोंग्याचा आवाज ४५ ‘डेसिबल्स’पेक्षा (आवाजाच्या मोजणीच्या प्रमाणापेक्षा) अधिक आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता तेथे ११२ मशिदी आणि ४३ मदरसे असून मशिदींवरील भोंग्यांसाठी एकानेही प्रशासनाची अनुमती घेतलेली नाही. सर्व मदरसे अनधिकृत आहेत. याउलट हिंदूंनी हनुमान चालिसा म्हटल्यास ‘धर्माचा विषय पुढे आणतो’, असे सांगत त्याला विरोध केला जातो.

७. ‘लव्ह जिहाद अस्तित्वात आहे’, असे कोणतेही पालक सांगण्याचे धाडस करत नाहीत. अवैध वाळू उत्खनन, मद्य आणि गुटखा विकून लँड जिहाद आणि लव्ह जिहाद यांना पैसा दिला जात आहे. भारतमातेचे पुत्र हे सहन करणार नाहीत.