१. ग्रामदेवता महादेवाची पूजा करतांना पिंडीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे
‘मी प्रतिदिन सकाळी गवेगाळी येथील ग्रामदेवता महादेवाची पूजा करतो. त्या वेळी मला महादेवाच्या पिंडीमध्ये प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) दिसतात. त्या वेळी ‘मी त्यांच्यावर जलाभिषेक करत आहे’, असे मला जाणवते.
२. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि स्तोत्रे यांच्यातील चैतन्यामुळे देवळाच्या परिसरात जंगली प्राणी अन् पक्षी येणे आणि शंखनाद केल्यावर ते परत जाणे
मी देवळात पूजा करतांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, चंडीकवच आणि श्री बगलामुखी स्तोत्र लावतो. भजने आणि स्तोत्रे ऐकण्यासाठी देवळाच्या परिसरात ४ – ५ हरणे, मोर, तसेच कोल्हा अन् गवारेडा यांसारखे जंगली प्राणी आणि पक्षी येतात. मी शंखनाद केल्यावर ते परत जातात. ‘भजने आणि स्तोत्रे यांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्यामुळेच जंगली प्राणी आणि पक्षी येतात’, असे मला वाटते. हे पाहिल्यावर माझा भाव जागृत होतो.
३. देवळात महादेवाची पूजा करण्यासाठी गेल्यावर नागदेवतेचे दर्शन होणे, तिने फणा काढून दाखवणे आणि पूजेनंतर शंखनाद केल्यावर ती स्वतःहून निघून जाणे
एकदा मी देवळात महादेवाची पूजा करायला गेल्यावर ‘नागदेवता वेटोळे घालून बसली आहे’, असे मला दिसले. मी गाभार्यात गेल्यावर नागदेवतेने मला फणा काढून दाखवला. तेव्हा ‘नागदेवतेने आशीर्वाद दिला’, असे मला वाटले. त्यानंतर मला ‘तू केवळ पूजा कर’, असा आवाज ऐकू आला. ते ऐकून मी पूजेला आरंभ केला. पूजा पूर्ण होईपर्यंत नागदेवता तिथेच गाभार्यात होती. मी शंखनाद केल्यावर ती स्वतःहून निघून गेली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सर्वच देवता देवळात उपस्थित असतात.’ मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.
४. ‘मंदिरातील प्रत्येक वस्तू सजीव झाली आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. ज्ञानेश्वर आप्पाना गावडे, गवेगाळी, बेळगाव. (११.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक