समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणाविरोधी कायदा’ रहित करा !

  • अपघात रोखण्यासाठी श्री स्वामी समर्थ संप्रदायाने महामृत्यूंजय जप केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण

  • हिंदु जनजागृती समितीची मागणी

अपघात रोखण्यासाठी श्री स्वामी समर्थ संप्रदायाने केलेला महामृत्यूंजय जप

मुंबई – सध्या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे; मात्र समाजहित लक्षात घेता हे अपघात होऊ नयेत, यासाठी दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या वतीने सव्वा कोटी महामृत्यूंजय मंत्रजप करण्यात आला. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ‘जादूटोणाविरोधी कायद्या’च्या आधारे बुलढाणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शुद्ध हेतूने समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणे, हा सरळसरळ जादूटोणा कायद्याचा दुरुपयोग आहे. हा कायदा अंधश्रद्धांचे नव्हे, तर हिंदूंच्या धर्मश्रद्धांचेही निर्मूलन करणारा आहे, हेच अंनिसवाल्यांनी केलेल्या तक्रारीतून सिद्ध झाले आहे. यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याच्या विरोधात शेकडो आंदोलने केली होती. उद्या जर कुणी विश्‍वकल्याणार्थ यज्ञयाग केला, तर त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्याची मागणी ‘अंनिस’कडून केली जाईल आणि असे गुन्हे नोंद करून धार्मिक कृत्यांवर गंडांतर आणले जाईल. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा आणि श्रद्धेवर आघात करणारा हा काळा कायदाच रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. घनवट पुढे म्हणाले की,

१. जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदु धर्माच्या विरोधातच आहे. जर हा कायदा केवळ फसवणूक, आर्थिक लुबाडणूक वा अत्याचारांच्या विरोधात आहे, तर ‘समृद्धी महामार्गावरील अपघात रोखावेत’, ‘लोकांचा जीव वाचावा’, या शुद्ध हेतूने स्वत:च्या खर्चाने कुणी प्रार्थना, पूजा, मंत्रजप आदी करत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे ? यात कोणता अपराध आहे ? यातून कुठे कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली ? याचे उत्तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि त्यांच्या दबावामुळे गुन्हा नोंदवणारे पोलीस यांनी हिंदु समाजाला द्यायला हवे.

२. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रतीवर्षी आषाढी अन् कार्तिकी वारीला श्री पांडुरंगाच्या चरणी ‘बळीराजा सुखी होऊ दे, चांगले पीक येऊन, दुष्काळ वा नैसर्गिक आपत्ती दूर होऊ दे’, असे म्हणून पूजा करतात. मग त्या पूजेवरही अंनिसवाले गुन्हा नोंदवणार का ? अनेक मंत्री त्यांच्या निवासस्थानी वा कार्यालयात ‘शुभकार्य व्हावे, अथडळे दूर व्हावेत’; म्हणून श्री सत्यनारायण पूजा करतात. त्यांच्यावरही अंनिसवाले गुन्हा करणार का ? जनतेच्या रक्षणासाठी प्रार्थना करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून जनहित कसे साध्य होऊ शकते ? हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी हा कायदा एक हत्यार म्हणून वापरला जात आहे.

३. एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो. सरकारने अंनिसवाल्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा रहित करावा.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

संपादकीय भूमिका

जनहितासाठी महामृत्यूंजय जप करणार्‍या आध्यात्मिक संस्थेच्या विरोधात तक्रार नोंदवणार्‍या अंनिसवाल्यांचे हिंदुद्वेषी स्वरूप जाणा !