पणजी, २७ जुलै (पसूका) – भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव कार्यात असाधारण कार्यक्षमता आणि जलद प्रतिसाद दाखवून ३६ जणांचे प्राण वाचवले आणि संभाव्य पर्यावरणीय हानी टाळली.
सीएस्आयआर्-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था ‘सिंधु साधना’ ही संशोधन नौका कारवारच्या दिशेने जात असतांना संकटात सापडली होती. नौकेचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले होते, त्यामुळे ते गतीहीन झाले आणि समुद्राच्या प्रवाहात वाहून चालले होते. २६ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता गोव्यातील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला. संकटाच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत भारतीय तटरक्षक दलाने ‘आयसीजीएस् सुजीत’ आणि ‘आयसीजीएस् वराह’ या २ अत्याधुनिक नौकांद्वारे कुशल पथकांसह सर्वोच्च प्राधान्याने बचाव मोहीम चालू केली. आपत्तीची संभाव्य तीव्रता ओळखून भारतीय तटरक्षक दलाने नौकेचे रक्षण, सागरी परिसंस्थेचे रक्षण आणि नौका मध्येच थांबून राहू नये, यासाठी तातडीने उपाययोजना चालू केल्या.
‘सिंधु साधना’ बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात असल्याने परिस्थिती गंभीर होती. याखेरीज पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कारवार किनार्यापासून ही नौका जवळ असल्याने तेलगळती होण्याची शक्यता होती, ज्यामुळे सागरी पर्यावरणाचीही हानी झाली असती.
अतिशय प्रतिकूल हवामानात, समुद्रातील लाटा आणि ४५ नॉटीकल मैलापर्यंत वारे वहात असतांनाही भारतीय तटरक्षक दलाने संकटात सापडलेल्या नौकेची बचाव मोहीम हाती घेतली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जहाज टोईंग (अन्य नौकेला बांधून ओढणे) करण्यासाठी प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे. ‘सिंधु साधना’संशोधन नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.