३३ वर्षांनंतर श्रीनगरमधील संवेदनशील लाल चौकातून गेली मोहरमची मिरवणूक !

जिहादी आतंकवाद्यांच्‍या भयामुळे वर्ष १९८९ पासून फेरीला नव्‍हती अनुमती !

श्रीनगर (जम्‍मू-काश्‍मीर) – मोहरमनिमित्त शिया मुसलमानांनी २७ जुलै या दिवशी तब्‍बल ३३ वर्षांनी लाल चौकातून मिरवणूक काढली. यामध्‍ये शेकडो लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीला ‘ताजिया’ म्‍हटले जाते.

वर्ष १९८९ मध्‍ये मोहरमनिमित्त काढलेल्‍या ताजियामध्‍ये यासिन मलिक, जावेद मीर आणि हमीद शेख हे आतंकवादी घुसले होते. त्‍यामुळे तत्‍कालीन राज्‍यपाल जगमोहन यांनी ताजियावर बंदी घातली होती. तेव्‍हापासून ही बंदी तशीच होती. २७ जुलैला काढण्‍यात आलेल्‍या मिरवणुकीसाठी ‘कुणीही कोणत्‍याही आतंकवादी संघटनेच्‍या आतंकवाद्याचे छायाचित्र झळकवू नये, बंदी असलेली चिन्‍हे वापरू नयेत’, आदी अटी घालण्‍यात आल्‍या होत्‍या. काश्‍मीरचे पोलीस आयुक्‍त व्‍ही.के. भिदुरी यांनी प्रशासनाचे हे पाऊल ऐतिहासिक असल्‍याचे म्‍हटले आहे. तत्‍कालीन जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित झाल्‍यामुळे जिहादी आतंकवाद मंदावल्‍याने आणि जम्‍मू-काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्‍यानेच हा दिवस पहायला मिळत आहे, असे अनेकांचे म्‍हणणे आहे.

संपादकीय भूमिका

केंद्रशासनाने कलम ३७० रहित केल्‍यानंतर आकाश-पाताळ एक करून त्‍या विरोधात कंठशोष करणार्‍या धर्मनिरपेक्षतावाद्यांपासून पाश्‍चात्त्य प्रसारमाध्‍यमांपर्यंत कुणीच यावर काही बोलणार नाही ! आता राष्‍ट्रप्रेमी जनतेनेच यासंदर्भात त्‍यांना जाब विचारला पाहिजे !