भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

डावीकडून श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलंबो (श्रीलंका) – भारतासमवेत आपले जवळचे संबंध आहेत. भारतसमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे देशाचे भविष्य चांगले होण्यास साहाय्य होईल, असे उद्गार श्रीलंकेचे परराष्ट्र राज्यमंत्री ठरका बालासूर्या यांनी येथे काढले. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे २ दिवसांच्या भारत दौर्‍यानंतर श्रीलंकेत परतले. त्यांच्या दौर्‍याविषयी माहिती देण्यासाठी बालासूर्या यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोतल होते.

बालासूर्या पुढे म्हणाले की, विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मान्यवरांची भेट घेतली. यामुळे शेजारी देशांशी आपले संबंध अधिक सशक्त होण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात थेट नौका सेवा, तसेच जाफना आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्याधुनिक करण्यावरही चर्चा चालू आहे. जर आपण भारताशी चर्चा करून सध्याच्या बंदरांचा विस्तार केला, तर आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. श्रीलंकेत पवन, सौर आणि हरित ऊर्जा यांचा विकास करण्यावरही भारताशी चर्चा करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !