लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

मुंबई – नाशिक येथील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत केली. नाशिक येथील शिक्षण विभागात चालू असलेल्या अपहाराच्या प्रकरणी काही मासांपूर्वी तेथील आयुक्तांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्याविषयीचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला.

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत. या वेळी काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाद्वारे चौकशीची मागणी केली. त्यानुसार गृहमंत्र्यांनी वरील घोषणा केली.