पाकच्या इस्लामिया विद्यापिठातील शेकडो विद्यार्थिनींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ आले समोर !

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात होत होती तस्करी !

लाहोर (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतात असलेल्या बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापिठातील शेकडो विद्यार्थिनींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ समोर आले आहेत. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सैयद मोहसिन रझा नकवी यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पोलीस या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. या प्रकरणी विद्यापिठाच्या आर्थिक सूत्रांचे संचालक डॉ. अबुजर, मुख्य संरक्षण अधिकारी सैयद एजाज शाह आणि वाहतूक अधिकारी अल्ताफ यांना अटक करण्यात आली आहे. विद्यापिठाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, विद्यापिठाच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे.

या प्रकरणी एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला. विद्यापिठातील किमान ११३ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे आहेत, ज्यांना अमली पदार्थांचे व्यसन जडले आहे, असे सांगितले जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांचे लक्ष्य विद्यापीठ नसून अमली पदार्थांची तस्करी करणे, हे आहे.

परीक्षेत गुण मिळण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र होऊन त्यांचे व्हिडिओ बनवून पाठवण्यासाठी सांगितले जात होते. विद्यापिठात एखाद्या पदावर भर्ती होण्यासाठीसुद्धा अशा प्रकारे संबंधित महिला उमेदवाराला करण्यास सांगितले जाई. पोलिसांचे म्हणणे आहे की, शिक्षकांचा एक समूह अमली पदार्थांची खरेदी-विक्री, तसेच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण यांमध्ये सहभागी होता. एवढेच नव्हे, तर विद्यापिठात लैंगिक संबंधांसाठी आयोजित मेजवान्यांचा (‘सेक्स पार्ट्यां’चा) भाग होण्यासाठीही विद्यार्थिनींना बाध्य केले जात होते. या प्रकरणाचे अन्वेषण एका उच्चस्तरीय समितीकडून केले जाईल.

संपादकीय भूमिका

भूकेकंगाल झालेल्या जिहादी पाकिस्तानातील शैक्षणिक क्षेत्रही रसातळाला गेले आहे, हे या घटनेवरून सिद्ध होते !