मणीपूरमध्ये २ दिवसांत म्यानमारच्या ७१८ नागरिकांचा विनाअनुमती भारतात प्रवेश !

मणीपूर सरकारकडून सैन्याला अहवाल सादर करण्याचा आदेश

नवी देहली – मणीपूरच्या सीमेवरील २२ आणि २३ जुलै या २ दिवसांत म्यानमार मधील ७१८ नागरिकांनी भारतात प्रवेश केला. याविषयी मणीपूर सरकारने आसाम रायफल्स या सैन्याच्या तुकडीला विस्तृत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यात म्हटले आहे की, या नागरिकांना योग्य कायदपत्रांविना भारतात येण्याची अनुमती कशी दिली ?’ सरकारने चंदेल जिल्ह्याचे उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना या नागरिकांची छायाचित्रे आणि हाताचे ठसे घेण्याचा आदेश दिला आहे. मणीपूरमध्ये गेल्या २ मासांहून अधिक काळ हिंसाचार चालू असतांना अशी घटना घडणे, हे संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. या नागरिकांनी त्यांच्या समवेत शस्त्रसाठा आणला आहे का ? ही माहिती मिळू शकली नाही.

संपादकीय भूमिका 

या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !