ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीतील वजू खाना (नमाजापूर्वी हात आणि पाय धुण्याची जागा) वगळून सर्व परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याचा आधार घेतला आहे.

सध्या ज्ञानवापी परिसराची देखरेख करणारी अंशुमन इंतेजामिया मशिदीचे महासचिव यासीन यांनी सांगितले की, या परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश यापूर्वी ९ सप्टेंबर २०२२ या दिवशी वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. यावर नियमित सुनावणी होत असतांना पुन्हा सर्वेक्षणाचा आदेश कसा दिला जाऊ शकतो ? वजू खाना न्यायालयाच्या आदेशाने प्रतिबंधित करण्यात आल्यानंतर पूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देणे हा न्यायालयाचाच अवमान आहे.