मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

दापोली आणि खेड येथे वस्त्रसंहितेविषयी झालेल्या बैठकांत मंदिर विश्वस्तांचे एकमत

दापोली येथील बैठकीत उपस्थित मंदिरांचे विश्वस्त आणि हिंदु जनजागृती समितीचे सदस्य

दापोली, २२ जुलै (वार्ता.) – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंना देवदर्शन भावपूर्ण कसे घ्यायचे ? हे ठाऊक नाही, त्यामुळे काही जण अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक, तोकडे वस्त्रे घालून मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराच्या स्वरूपात मिळालेला दैवी वारसा जपणे, सात्त्विकता-चैतन्याचे संवर्धन करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. या अनुषंगाने मंदिर विश्वस्तांनी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.

वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) संदर्भात १५ जुलै या दिवशी दापोली येथील पेन्शनर सभागृहात, तर १६ जुलै या दिवशी खेड येथील श्री वैश्य हनुमान मंदिर येथे मंदिर विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी श्री. शिंदे बोलत होते.

खेड येथील मंदिरांचे विश्वस्त आणि समितीचे सदस्य जयघोष करतांना 

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे, याविषयी या बैठकीत विश्वस्तांचे एकमत झाले. या वेळी ‘अन्य पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्याविषयी ठराव करून मंदिराबाहेर वस्त्रसंहिता फलक निश्चित लावू’, असे मत विश्वस्तांनी व्यक्त केले.
दापोली येथील बैठकीत समितीचे श्री. परेश गुजराथी आणि खेड येथे श्री. शिवाजी सालेकर यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.

दापोली येथील मंदिर विश्वस्तांचे मनोगत

१. श्री. विजय जोशी, श्री व्याघ्रेश्वरी देवस्थान, आसूद – आमच्या विश्वस्तांशी चर्चा करून मंदिरात फलक निश्चित लावणार, तसेच परिसरातील मंदिरांत फलक लावण्यासाठी प्रयत्न करू.

२. श्री. नंदकुमार चोगले, पाजपंढरी – मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहितेसारखी बंधने हवीत.

३. श्री. सुरेश रेवाळे, उपाध्यक्ष, श्री महालक्ष्मी देवस्थान, जालगाव – मंदिरांसाठी ‘ड्रेसकोड’ अवश्य आहे. हिंदु तरुण/तरुणींना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

४. श्री. श्रीकृष्ण पेठे, विश्वस्त श्रीराममंदिर, प्रभुआळी – सध्या समाज धर्माचरणापासून दूर चालला आहे, सदस्यांशी चर्चा करून याविषयी ठराव करू.

५. श्री. अशोक जालगावकर, अध्यक्ष श्री भैरी मंदिर, जालगाव – कपड्यांविषयी घराघरांतून जागृती व्हायला हवी, असे फलक प्रत्येक मंदिराबाहेर लागले पाहिजेत.

दापोली येथील बैठकीला उपस्थित असलेले मंदिर विश्वस्त

श्री काळकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर चोरगे, कार्याध्यक्ष श्री. संदेश शिंदे, श्री महालक्ष्मी देवस्थान जालगावचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश मिसाळ, श्री. सुरेश खेडेकर, इच्छापूर्ती गणेश मंदिराचे सचिव श्री. अनिल देसाई, गिम्हवणे येथील श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री. शंकर साळवी, श्री. आत्माराम बागकर, श्री भैरी देवस्थान जालगावचे श्री. अनंत मेंगे, श्री. अनंत मोहिते आणि श्री. शशिकांत सुर्वे

खेड येथील मंदिर विश्वस्तांचे मनोगत

१. श्री. समीर पाटणे, श्री साई मंदिर, समर्थनगर – हिंदूंना धर्माची आणि मंदिरात येण्याविषयी गोडी लावणे महत्त्वाचे आहे.

२. ह.भ.प. गणपत महाराज येसरे, सचिव, वारकरी मठ, भरणे – संस्कृती जपण्याचे कार्य आपल्या घरापासून केले पाहिजे. सात्त्विक वेशभूषेने ईश्वरी चैतन्य मिळते. वारकरी सदरा धोतर नेसून स्वतः परंपरा पाळतात.

३. श्री. प्रशांत सोनी, श्री गणेश मंदिर, स्वरूपनगर- देवळात समाधान आणि पावित्र्य मिळवण्यासाठी जातोय याचे भान ठेवून दर्शनार्थीने अचकट विचार, कपडे टाळले पाहिजेत. त्याविषयी जागृती केली पाहिजे.

४. श्री. अभिजीत चिखले, अध्यक्ष, श्री साई मंदिर, समर्थनगर – मंदिरात व्यवस्थित आणि योग्य कपडे घालूनच दर्शनाला गेले पाहिजे.

५. श्री. शैलेश धारीया, श्री स्वामी समर्थ मंदिर, शिवाजीनगर – देवाप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. असात्त्विक वेश नसावा. आपल्यामध्ये संघटन पाहिजे. जागृतीसाठी कार्यशाळा घेणे आणि वस्त्रसंहिता लागू करणे महत्त्वाचे आहे

खेड बैठकीस उपस्थित अन्य मंदिर विश्वस्त

खेड येथील श्री महाकाली मंदिर कासारआळीचे अध्यक्ष श्री. मनोज कवळे, श्री पाथरजाई मंदिराचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाटणे-शेट्ये, श्री शिव मंदिर,खांबतळेचे श्री. मदन गोपाळ करवा, श्री वैश्य हनुमान मंदिराचे पुजारी श्री. हरलींग जंगम आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके, अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, श्री. विलास भुवड आणि श्री. संदीप तोडकरी उपस्थित होते.