दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इरसाळवाडी दुर्घटनेविषयी देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन !

इरसाळवाडी दुर्घटना

मुंबई, २० जुलै (वार्ता.) – दुर्घटना झालेली इरसाळवाडी उंच आणि दुर्गम डोंगर भागात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. पायी जाण्यासाठी दीड घंटा वेळ लागतो. जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तेथे जेसीबी पोचत नाही. सध्या सिडकोचे ५०० आणि स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेले मनुष्यबळ यांद्वारे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम चालू आहे. या कामाला अधिक वेळ लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० जुलै या दिवशी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.

ते म्हणाले, ‘‘इरसाळवाडी येथे एकूण ४८ कुटुंबे असून २२८ लोकसंख्या आहे. १७ ते १९ जुलै या कालावधीत येथे ४९९ मिलीलीटर इतका पाऊस पडला. या दुर्घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला रात्री १०.३० ते ११ या कालावधीत मिळाली. त्यानंतर त्वरित तेथे साहाय्य देण्यात आले. सध्या पायी जाऊन साहाय्य पोचवण्यात येत आहे. ही वाडी तीव्र उतारावर आहे. मुंबईपासून ८० किलोमीटर अंतरावर हा भाग आहे. येथे ठाकर या आदिवासी जमातीच्या लोकांचे वास्तव आहे. भारती भू वैज्ञानिक विभागाच्या नोंदीनुसार या भागाचा समावेश दरडी कोसळणे किंवा भूस्खलन यांच्या सूचीत नाही. दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत. उर्वरित व्यक्तींचा शोध चालू आहे. सततचा पाऊस, तीव्र उतार यांमुळे कामामध्ये अडथळा येत आहे.

पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ६० जवान सकाळी ६ वाजता घटनास्थळी पोचले आहे. यशवंती संस्थेचे गिर्यारोहक, तसेच श्वानपथकही घटनास्थळी पोचले आहे. बचाव कार्यासाठी हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर सांताक्रूझ येथे उपलब्ध आहेत; मात्र खराब हवामानामुळे त्यांचे उड्डाण होऊ शकत नाही. घटनास्थळी डोंगराच्या पायथ्याशी ‘हेलिपॅड’ सिद्ध करण्यात आले आहे.  डोंगराळ भागामुळे शारीरिकदृष्ट्या सक्षम युवकांनाच तेथे जाता येत आहे. मंत्री गिरीश महाजन पहाटे ३.१५ वाजता घटनास्थळी पोचले. मंत्री उदय सामंत आणि कु. अदिती तटकरे यांसह माजी खासदार सुनील तटकरे डोंगराच्या पायथ्याशी पोचले असून बचावकार्याचे व्यवस्थापन पहात आहे. शासनाकडून जेवण, धान्य आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून आवश्यक ते साहाय्य दिले जात आहे. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोचले आहे.’’