महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

  • विधान परिषद लक्षवेधी सूचना

  • शिवशाही बसचे ६० अपघात !

महामंडळाच्‍या ५ सहस्र १५० नवीन इलेक्‍ट्रिक खासगी बसगाड्या घेणार ! – मंत्री दादा भुसे

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्‍यात वर्ष २०२२-२३ मध्‍ये राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या स्‍वमालकीच्‍या बसगाड्यांचे एकूण २४५ अपघात, तर शिवशाही बसचे ६० अपघात झाले असून यामध्‍ये एकूण ३६५ दिवसांत ३०५ अपघात झाले आहेत. महामंडळ ५ सहस्र ५ सहस्र १५० नवीन इलेक्‍ट्रिक खासगी बसगाड्या घेणार असून राज्‍य परिवहन महामंडळाचे चालक आणि वाहक यांच्‍यावर कोणताही अन्‍याय होणार नाही, अशी ग्‍वाही मंत्री दादा भुसे यांनी १९ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ही लक्षवेधी मांडली होती. या वेळी झालेल्‍या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार एकनाथ खडसे, कपिल पाटील, प्रवीण दरेकर आदी सदस्‍यांनी भाग घेतला.

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत. वर्ष २०२२-२३ महामंडळाच्‍या सेसमुळे (करामुळे) १० मृत्‍यू झाले आहेत. १४६ गंभीर अपघात असून किरकोळ १४२ अपघात झाले आहेत. वर्ष २०२३-२४ मध्‍ये गंभीर २०, तर किरकोळ २८ अपघात झाले आहेत. राज्‍यातील सर्व कर्मचार्‍यांना एस्.टी. महामंडळाच्‍या वतीने प्रशिक्षण दिले जाते.

ते म्‍हणाले की, शिवशाहीच्‍या ३ बसगाड्यांना आग लागल्‍यानंतर महामंडळाकडून उच्‍चस्‍तरीय समिती नियुक्‍त करण्‍यात आली असून समितीच्‍या चौकशी अहवालानंतर महामंडळाकडून आवश्‍यक त्‍या उपाययोजना केल्‍या जातील.