सीमा हैदर आणि सचिन यांची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून दुसर्‍या दिवशीही चौकशी

सीमा हैदर आणि सचिन

नोएडा/गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर आणि तिचा नोएडा येथील प्रियकर सचिन यांना १७ जुलै या दिवशी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने चौकशीसाठी कार्यालयात नेल्यानंतर जवळपास ८ घंटे त्यांची चौकशी केली, तसेच दुसर्‍या दिवशीही चौकशी चालू होती. सीमा हैदर हिचे काका आणि भाऊ पाकिस्तानी सैन्यात आहेत. त्यांच्याविषयी पथकाच्या अधिकार्‍यांनी सीमाकडे चौकशी केली. यासह तिला पाकिस्तानमधून दुबई, तेथून नेपाळ आणि देहली येथे येण्यासाठी कुणी साहाय्य केले ? तिच्याकडे असलेले ४ भ्रमणभाष संच कुठे आहेत ? आदींचीही माहिती विचारण्यात आली. दुसरीकडे मुंबई पोलिसांना ‘सीमाला पाकिस्तानात परत पाठवा अन्यथा २६/११ सारखा आक्रमण करू’ अशा धमक्या मिळाल्यानंतर सीमा रहात असलेल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

१. सीमाच्या भारतात प्रवेशाविषयीची माहिती गुप्तचर विभागाने सीमा सुरक्षा दलाकडून मागितली आहे. सीमा नेपाळमधून बिहारमधील सीतामढी जिल्हा पार करून भारतात आली. या सीमेवर सीमा सुरक्षा दल तैनात आहे. ‘सीमा हैदर आणि तिच्या ४ मुलांकडे नेपाळचा पर्यटक व्हिसा असतांना त्यांनी भारताची सीमा ओलांडून भारतात प्रवेश कसा केला? चूक कुठे झाली ? ही चूक आहे कि कट?, अशी माहिती मागवण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुप्तचर विभागाचे एक पथक नेपाळलाही जाणार आहे. सीमा हिला नेपाळ सीमा पार करण्यासाठी कठल्या तरी व्यक्तीने साहाय्य केल्याचा संशय या विभागाला आहे. ज्या व्यक्तीने सीमाला भारतात प्रवेश मिळवून दिला ती व्यक्ती प्रभावशाली असावी, असाही संशय आहे.

२. सीमा हैदर पाकची गुप्तहेर असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास तिला आणि सचिन या दोघांनाही अटक होऊ शकते. ती हेर नसल्यास तिला पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते. तिला पाकमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याने कदाचित् ती भारताकडे आश्रयाची मागणी करू शकते. अशा वेळी सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.