चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याने केला श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास !

  • अणूबाँबचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर येत आहे चित्रपट

  • अणूबाँबने केलेल्या हानीमुळे पश्‍चात्ताप झालेल्या ओपनहायमर यांना गीतेमुळे मिळाली होती शांतता !

नवी देहली – अणूबाँबचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर ‘ओपनहायमर’ नावाने इंग्रजी चित्रपट बनवण्यात आला आहे. क्रिस्टोफर नोलन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ओपेनहायमर यांनी अणूबाँब बनवल्यानंतर अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ते जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर टाकले होते. यात लक्षावधी लोकांचा मृत्यू झाल्याने ओपेनहायमर यांना नंतर याचा पश्‍चात्ताप झाला होता आणि त्या काळात श्रीमद्भगवद्गीतेमुळे त्यांना शांतता मिळाली होती, असे त्यांनी म्हटले होते.  श्रीमद्भगवद्गीता वाचण्यासाठी ओपेनहायमर संस्कृत शिकले होते. या चित्रपटात त्यांची भूमिका करणार्‍या अभिनेत्यानेही श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास केल्याचे म्हटले आहे.

१. सिलियन मर्फी हे या चित्रपटात जे रॉबर्ट ओपेनहायमर यांची भूमिका साकारत आहेत. अभिनेते सिलियन मर्फी यांनी ओपेनहायमर यांच्या भूमिकेविषयी सांगितले की, भूमिकेची सिद्धता करण्यासाठी मी श्रीमद्भगवद्गीता वाचली होती. ओपेनहायमर यांच्या मानसिकतेचा आणि विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी गीतेचा अभ्यास केला. गीता एक सुंदर पुस्तक आहे. ते अतिशय प्रेरणादायी आहे. ओपेनहायमर यांनाही त्या काळात या पुस्तकाची आवश्यकता होती. नंतरही त्यांना गीतेचा लाभ होत राहिला.

२. जे रॉबर्ट ओपेनहायमर यांनी पूर्वी सांगितले होते की, जेव्हा जगातील पहिला अणूबाँबचा स्फोट यशस्वी ठरला होता, तेव्हा माझ्या मनात श्रीमद्भगवद्गीतेमधून भगवान श्रीकृष्णाचे बोलत ऐकू आले होते. ते म्हणत होते की, मी आता जगाचा विनाश करणारा मृत्यू बनलो आहे.

(सौजन्य : WION)

संपादकीय भूमिका 

गीतेचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना कळते; मात्र भारतात शाळेत गीता शिकवण्याचे सूत्र आल्यावर निधर्मी राज्यकर्ते त्याला विरोध करतात, हे संतापजनक !