कॅनडात खलिस्तान्यांनी फलकावर लिहिले पंतप्रधान मोदी ‘आतंकवादी’ !

ब्रॅम्पटन (कॅनडा) – कॅनडाच्या ब्रॅम्पटन शहरातील ‘श्री भगवद्गीता पार्क’मध्ये लावण्यात आलेल्या फलकावर खलिस्तान्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आतंकवादी’ असल्याचे लिहिले. येथील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच फलकावरील हे शब्द पुसून टाकले. कॅनडाच्या मिसिसॉगा शहरामध्ये खलिस्तान समर्थकांकडून १६ जुलै या दिवशी खलिस्तानसाठी जनमत संग्रह करण्यात येणार आहे. त्यापूर्वीही घटना घडल्याने यामागे खलिस्तानी समर्थक असल्याचे म्हटले जात आहे. या पार्कचे नाव काही मासांपूर्वीच पालटून ‘श्री भगवद्गीता पार्क’ करण्यात आले. येथे देवतांच्या मूर्तीही स्थापन करण्यात येणार आहेत. यात श्रीकृष्णार्जुनाची रथावर आरुढ असणारी मूर्ती असणार आहे.

१. या घटनेविषयी ब्रॅम्पटन शहराच्या प्रशासनाकडून ट्वीट करून सांगण्यात आले की, पार्कमधील फलकाला लक्ष्य करण्याच्या घटनेमुळे निराशा आली. हे एका धार्मिक समुदायावरील आक्रमण आहे. हे प्रकरण पोलिसांकडे पाठवण्यात आले आहे. दुर्दैवाने या भागातील अशा प्रकारच्या यापूर्वीच्या घटनांप्रकरणी कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (कॅनडातील पोलिसांची ही निष्क्रीयता म्हणायची कि खलिस्तान्यांना पाठीशी घालण्याची वृत्ती म्हणायची ? – संपादक) ब्रॅम्पटन शहरामध्ये आम्ही असहिष्णुता आणि भेदभाव यांच्या संदर्भातील कृत्यांच्या विरोधात संघटित आहोत. आम्ही विविधता, सर्वसमावेशकता आणि सर्वांप्रती सन्मान कायम ठेवत विद्वेषी कृत्यांना सहन करणार नाही.

२. शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी म्हटले की, शहरामध्ये कोणत्याही धार्मिक समाजाला धमकावणार्‍यांच्या प्रती शून्य सहनशीलता नीती लागू आहे.

३. यापूर्वी ७ जुलै या दिवशी ब्रॅम्पटन शहरातील भारतमाता मंदिराबाहेर भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांच्या विरोधात एक भित्तीपत्रक लावण्याची घटना घडली होती. तसेच खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

कॅनडा आता ‘खलिस्तानी देश’ झाला असून तेथील हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित झाली आहेत. याविषयी आता भारताने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !