अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग ! – अमेरिका

वॉशिंग्टन – अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे अमेरिकेच्या संसदीय समितीने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यानंतर मासाभरात संसदीय समितीने हा ठराव संमत केला. यावरून स्पष्ट होते की, अमेरिका अरुणाचल प्रदेशला चीनचा नव्हे तर भारताचा अविभाज्य भाग मानते, असे बोलले जाते. हा ठराव सिनेटर्स जेफ मर्क्ले, बिल हेगर्टी, टिम केन आणि ख्रिस व्हॅन यांनी मांडला होता.

भारताच्या सीमेवर चीन सातत्याने घुसखोरी करत आहे. अलीकडेच चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशचा काही भाग कह्यात घेतला होता. याविषयी अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. अमेरिकेने मॅकमोहन रेषेला चीन आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. सिनेटर कॉर्निन म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने लोकशाहीच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

संपादकीय भूमिका

अमेरिका चीनला सर्वांत मोठा शत्रू मानते. अलीकडच्या काळात भारत काही प्रमाणात चीनच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबत आहे. त्यामुळेच एरव्ही भारताला पाण्यात पहाणारी अमेरिका अशी वक्तव्ये करून भारताला स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे !