राजस्थानमधील प्राचीन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

पुष्कर येथील प्रसिद्ध ब्रह्म मंदिराचाही समावेश !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

जयपूर – राजस्थानच्या जयपूर, उदयपूर, अजमेर यांसह इतर जिल्ह्यांतील प्राचीन मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील फलक, भीत्तीपत्रके मंदिरांमध्ये लावण्यात आली आहेत. या भीत्तीपत्रकांवर ‘हाफ पँट, बर्मुडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फाटलेली जीन्स, फ्रॉक घालूून मंदिरात प्रवेश करू नका’, असे लिहिले आहे.

१. जयपूरमधील महादेव मंदिर, भिलवाडा येथील श्री चारभुजा नाथ मंदिर, सिरोही जिल्ह्यातील श्री पावपुरी जैन मंदिर, सरनेश्‍वर महादेव मंदिर, तसेच पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर, अजमेरमधील श्री अंबेमाता मंदिर, उदयपूरमधील श्री जगदीश मंदिर इत्यादी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

मंदिर हे पर्यटन स्थळ नाही ! – मंदिर व्यवस्थापन मंडळ

२. राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी बहुतांश मंदिर व्यवस्थापन मंडळांचे म्हणणे आहे की, मंदिर हे पर्यटनाचे स्थळ नाही. मंदिरात येणार्‍या भाविकांनी पारंपरिक कपडे परिधान करून यावे. मंदिर हे श्रद्धेचे ठिकाण आहे, त्याच्याशी प्रत्येकाची श्रद्धा जोडलेली आहे. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांनी परदेशी नव्हे तर भारतीय संस्कृती अंगीकारावी म्हणून हे केले जात आहे.

संपादकीय भूमिका 

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे  अभिनंदन !