पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्रदान

हा सन्मान मिळवणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन

पॅरिस (फ्रान्स) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी १३ जुलैला रात्री फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजवाड्यात फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमधील ‘ला सीन म्युझिकल’ येथे भारतियांना संबोधित केले. ते म्हणाले की, फ्रान्समध्ये येणे, म्हणजे घरी येण्यासारखे आहे. भारतातील लोक जेथे जातात तेथे लहान भारत बनवतात. जागतिक व्यवस्थेत भारताची विशेष भूमिका आहे. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताचा अनुभव आणि प्रयत्न जगाला उपयुक्त ठरत आहेत. भारत पुढील २५ वर्षांच्या विकासाच्या लक्ष्यावर काम करत आहे. आज प्रत्येक आंतरराष्ट्रीय संस्था भारत पुढे जात असल्याचे सांगत आहे.

फ्रान्समध्येही ‘युपीआय’द्वारे (ऑनलाईन) आर्थिक व्यवहार करता येणार !

फ्रान्समध्ये ‘युपीआय’ (ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याची प्रणाली) वापरण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात करार झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या करारामुळे आता फ्रान्समधील लोकांनाही ‘युपीआय’ वापरता येणार आहे. यामुळे भारतातील नवनिर्मितीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

युपीआयच्या वापरासाठी या वर्षी सिंगापूरच्या ‘पे नाऊ’ समवेत भारताचा करार झाला. यासह संयुक्त अरब अमिरात, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये यापूर्वीच ही प्रणाली चालू करण्यात आली आहे. आता अमेरिका, युरोपीय देश आणि पश्‍चिम आशियामध्ये आंतरराष्ट्रीय युपीआय सेवा चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे.