जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या ! – प्रांत कार्यालयावर मोर्च्‍याद्वारे मागणी

इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर काढण्‍यात आलेला मोर्चा

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – गेल्‍या काही दिवसांपासून धर्मांधांकडून विविध आघात केले जात आहेत. नुकतीच कर्नाटकात जैन मुनी १०८ कामकुमारनंदी महाराज यांची हत्‍या करण्‍यात आली. तरी जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि वीर सेवा दल यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. या प्रसंगी शिवप्रसाद व्‍यास, सोमेश्‍वर वाघमोडे, सुजित कांबळे, बाळासाहेब ओझा, मुकेश चोथे, मुकेश दायमा, गणेश कांदेकर, राजू पाटील, आनंदा मुकोटे यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

उपविभागीय अधिकारी सौ. मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन देतांना जैन समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते

१. उपविभागीय अधिकारी सौ. मौसमी बर्डे-चौगुले यांना समस्‍त दिगंबर जैन समाज, बोर्डिंग इचलकरंजी, वीर सेवा दल, जैन बोर्डिंग इचलकरंजी यांच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी रवींद्र पाटील, बा.बा. हुपरे, सुभाष बलवान, शुभम कोथळे, वृषभ खंडेराजुरे यासंह अन्‍य उपस्‍थित होते.

२. जयसिंगपूर येथे शहरात जैन समाजाच्‍या वतीने फेरी काढून तहसीलदारांना निवेदन देण्‍यात आले. कबनूर आणि हातकणंगले येथेही निवेदन देण्‍यात आले.

३. रुकडी येथे बंद ठेवून नंतर झालेल्‍या शोकसभेत जैन मुनींची हत्‍या करणार्‍यांना फाशी देण्‍याची मागणी करण्‍यात आली.

४. निपाणी (कर्नाटक) येथे जैन श्‍वेतांबर आणि जैन दिगंबर समाजाच्‍या वतीने तहसीलदार कार्यावर मूक मोर्चा काढून आरोपींना कठोर शिक्षा व्‍हावी, अशी मागणी करण्‍यात आली. या मोर्च्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी पाठिंबा दिला होता.