म. गांधी यांनी स्वतःचे प्राण देऊन पाकला विनाशापासून वाचवले ! – इश्तियाक अहमद, पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक

  • पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक इश्तियाक अहमद यांचे विधान !

  • महंमद अली जिना यांनी म. गांधी आणि नेहरू यांच्याप्रती कृतज्ञ रहायला हवे होते!

इश्तियाक अहमद, पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक

नवी देहली – पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांनी म. गांधी आणि तत्कालीन भारत सरकार यांच्याप्रती कृतज्ञ रहायला हवे होते; कारण त्यांच्यामुळे पाकिस्तान विनाशापासून बचावला. म. गांधी यांनी तर स्वतःचे प्राण देऊन पाकचे रक्षण केले, असे विधान पाकिस्तानी वंशाचे स्विडनमधील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी एका मुलाखतीमध्ये केले.

इश्तियाक अहमद यांनी सांगितले की,

१. फाळणीच्या वेळी भारतातील सर्व मुसलमान जर पाकिस्तानमध्ये आले असते, तर पाकचा विनाश झाला असता. त्या वेळी म. गांधी आणि नेहरू यांनी पाकच्या मागे उभे राहून साहाय्य केले.

२. भारतातून सर्व मुसलमान पाकिस्तानमध्ये यावेत, हे महंमद अली जिना यांनाही नको होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानने ज्या प्रमाणे तेथील हिंदू आणि शीख यांना राहू दिले नाही, तसेच भारतानेही तेथील साडेतीन कोटी मुसलमानांना राहू दिले नसते, तर ते भारतातून पाकमध्ये आले असते.

३. त्या वेळी पूर्व पाकिस्तान तर गरीबच होता. पश्‍चिम पाकिस्तानची त्या वेळी लोकसंख्या सव्वातीन कोटी होती. जर भारतातून सर्वच मुसलमान पाकमध्ये आले असते, तर ही लोकसंख्या पावणे सात कोटींहून अधिक झाली असती. असे म्हणतात त्या वेळी पाकिस्तानमध्ये लिहिण्यासाठी कागदही नव्हते. अशा वेळी जर हे सर्व मुसलमान पाकमध्ये आले असते, तर पाकचा विनाश होऊन तो नष्ट झाला असता.

४. यापासून म. गांधी आणि नेहरू यांनी पाकला वाचवले. त्यासाठी जिना यांनी या दोघांप्रती कृतज्ञ असायला हवे होते, त्यांनी पाकसाठी इतके केले.

संपादकीय भूमिका 

म. गांधी यांनी पाकला विनाशापासून वाचवले; मात्र भारताला विनाशाच्या खाईत ढकलून दिले, असेच देशभक्तांना वाटते !