नसरापूर (जिल्हा पुणे) – ‘ग्रीन फील्ड’ महामार्गाची चुकीची अधिसूचना रहित करून नियोजित आराखड्याप्रमाणे ‘रिंग रोड’ करावा. आमच्या गावात ‘रिंग रोड’ नको, असे म्हणत पुणे-सातारा महामार्गावर शिवरे ग्रामस्थांनी गुरे घेऊन ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र योग्य आश्वासन मिळाल्यावर दीड घंट्याने आंदोलन मागे घेतले. पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे फाट्यावर संमत उड्डाणपुलाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले. (उड्डाणपूल करण्यात दिरंगाई का केली जात आहे ? नागरिकांना त्यासाठी आंदोलन का करावे लागते ? – संपादक) या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, भोरचे तहसीलदार, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते. ‘रिंग रोड’च्या संदर्भात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली. रिंग रोडमधील भूमी अधिग्रहण अधिसूचना त्वरित रहित करावी, तसेच शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी हे रस्ता बंद आंदोलन केले होते. २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने ‘जगायचे कसे ?’ असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.