खलिस्तान्यांकडून विविध देशात आयोजित ‘किल इंडिया’ (भारताला ठार करा) मोर्च्यांचा फज्जा !

कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्‍यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !

नवी देहली – खलिस्तानी समर्थकांनी ८ जुलै या दिवशी कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांत आयोजित केलेल्या ‘किल इंडिया’ (भारताला ठार करा) या मोर्च्यांचा फज्जा उडाला. या मोर्च्यांद्वारे भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात येणार होते; मात्र या मोर्च्यांत तुरळक शीख सहभागी झाल्याने याला महत्त्व मिळाले नसल्याचे दिसून आले. दूतावासाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्तही ठेवला होता. कॅनडातील भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ भित्तीपत्रके लावली होती. खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येनंतर खलिस्तान्यांनी या मोर्च्यांचे आयोजन केले होते.

खलिस्तान्यांच्या या मोर्चांना प्रतिसाद न मिळण्यामागे भारताने आणलेला दबाव, तसेच खलिस्तान्यांनी भारतीय दूतावास अन् तेथील अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची दिलेली धमकी असल्याचे म्हटले जात आहे. भारताने स्पष्ट शब्दांत म्हटले होते, ‘जर खलिस्तान्यांना साहाय्य करण्यात आले, तर भारताशी या देशांचे संबंध बिघडू शकतात.’ यांमुळेच सर्वच देशांनी ही काळजी घेतल्याचे या मोर्च्यांच्या अनुषंगाने दिसून आले.

टोरंटो (कॅनडा) येथे भारतियांकडून खलिस्तान समर्थकांना जशास तसे उत्तर !

कॅनडातील टोरंटो शहरातील भारताच्या वाणिज्य दूतावासासमोर खलिस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. या वेळी भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्याला जशास तसे प्रत्युत्तर देत त्यांच्या समोर मोठ्या संख्येने गर्दी करून भारताचे झेंडे फडकावले आणि घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.

लंडन (ब्रिटन) येथे पोलिसांनी खलिस्तान समर्थकांना हाकलले !

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर ३० ते ४० खलिस्तान समर्थकांनी गर्दी करून निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना हाकलवून लावले. तत्पूर्वी लंडनमध्ये खलिस्तान्यांनी मोर्चा काढला होता. यात अतिशय अल्प जण सहभागी झाले होते. त्यांच्या हातात भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी आणि बर्मिंघम येथील भारताचे महावाणिज्य दूत डॉ. शशांक यांची छायाचित्रे होती. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. या मोर्च्याच्या वेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते.

ब्रिटनकडून धमक्यांकडे गांभीर्याने पहाण्याचा अभाव !

भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान्यांकडून झालेल्या निदर्शनांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने लंडन येथील दूतावासातील अधिकार्‍यांना मिळालेल्या धमक्यांचे सूत्र ब्रिटनकडे उपस्थित केले आहे; मात्र तेथील अधिकारी याकडे सर्वसाधारण घटनेच्या दृष्टीने पहात आहेत. या धमक्यांचे गांभीर्य आणि त्यामागील हेतू यांकडे पहाण्याची आवश्यकता आहे. (ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशाचे असले, तरी भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना मिळणार्‍या धमक्यांकडे अशा प्रकारे पाहिले जात आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)