भारतीय दूतावासांना मिळालेली धमकी अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही, तर आतंकवाद !

  • भारताने कॅनडा सरकारला फटकारले !

  • कॅनडाच्या पंतप्रधानांनी धमकीला म्हटले होते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ !

नवी देहली – कॅनडातील भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना खलिस्तान्यांकडून देण्यात आलेली धमकी अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही, तर आतंकवाद आहे. आमच्या सरकारसाठी आमच्या राजदूतांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडा सरकारला फटकारले आहे.

त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांकडेही राजदूतांच्या सुरक्षेविषयी विचारणा केली आहे. ‘आम्ही अन्य देशांच्या सरकारांशीही यावर चर्चा केली आहे. काही जणांनी मत मांडले  आहे, तर काही जणांनी मत मांडावे, याची आम्ही अपेक्षा करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.


बागची म्हणाले की, कॅनडातील धमकीविषयी आम्ही तेथील सरकारकडे आमचे सूत्र मांडले आहे. आम्ही कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडे यांचे याविषयीचे विधान वाचले. त्यांनी याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हटले आहे. हे वक्तव्य म्हणजे हिंसेची वकिली करणे, फुटीरतावादाचा प्रचार करणे आणि आतंकवादाला वैध ठरवण्यासाठी या शब्दाचा केलेला दुरुपयोग आहे.