स्विडनमध्ये आता कुराण, बायबल आणि ज्यू धर्मियांचे ‘टोरा’ धार्मिक पुस्तक जाळण्याच्या मागणीचे अर्ज !

स्टॉकहोम (स्विडन) – एक आठवड्यापूर्वी येथे सलवान मोमिक या व्यक्तीने न्यायालयाची अनुमती घेऊन कुराण जाळले होते. त्याचे पडसाद संपूर्ण जगात, विशेषतः इस्लामी देशांत उमटले. आता स्टॉकहोम येथेच एका ३० वर्षीय व्यक्तीने १५ जुलै या दिवशी इस्रायलच्या दूतावासाबाहेर ज्यू धर्मियांचे धार्मिक पुस्तक ‘टोरा’ आणि ख्रिस्त्यांचे ‘बायबल’ जाळण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालीच ही अनुमती मागण्यात आली आहे.

दुसरीकडे एका ५० वर्षीय महिलेनेही कुराण जाळण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही अद्याप कुणाचीही मागणी फेटाळलेली नाही. प्रत्येकाच्या मागणीची समीक्षा केली जाणार आहे.

स्विडनमधील इस्रायलचे राजदूत जिव नेवो कुलमन यांनी या मागणीवर ट्वीट  करतांना म्हटले आहे की, मी स्विडनमध्ये आणखी धार्मिक पुस्तके जाळण्याच्या शक्यतेवरून भयभीत झालो आहे. मग ते ‘कुराण’ असो, ‘टोरा’ असो कि अन्य कोणतेही पुस्तक असो. हे घृणास्पद कृत्य असून ते रोखले पाहिजे.