काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेखर रापेल्ली या गोरक्षकाची हत्या करण्यात आली. राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा असतांना होणारी अशी हत्या अतिशय भयानक आहे. खरे तर या राज्यात असा कायदा असतांना गोरक्षण करावे लागणे, ही गोष्टच विचार करायला लावणारी आहे. गोरक्षकांच्या हत्येचा मुद्दा हा काही आजचा नाही. अशा प्रकारच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !
१. गायीचे आध्यात्मिक महत्त्व ठाऊक असतांनाही गोहत्या का होतात ?
आपला भारत देश हा गोपालकांचा देश आहे. गायीला आपल्या शास्त्रांमध्ये अतिशय पवित्र मानले गेले आहे. रघुवंशातील महाराज रघु गायीला वाचवण्यासाठी आपले प्राण द्यायला सज्ज झाले होते. भगवान श्रीकृष्णाने तर स्वतःचे बालपण गायींसमवेत घालवले. ते स्वतःला कायम ‘गोपालक’ म्हणवून घेत असत. दत्तगुरूंच्या मागे सतत आपण गाय पहात असतो. भगवान शंकरांचा सेवक नंदी हाही गोवंशीयच. कामधेनू ही तर समुद्रमंथनात सापडलेल्या रत्नांपैकी एक. चुकून झालेल्या गोहत्येसाठी गौतम ऋषींना फार मोठे तप करावे लागले होते, असे एक कथा सांगते. दिवाळी या सणाचा प्रारंभच वसुबारसेने होतो. या दिवशी प्रत्येक हिंदू गायीसह तिच्या वासराची पूजा करतो. गोपूजनाची अशी अतिशय थोर परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. अगदी आजही अनेक मंदिरे ही गोरक्षणाची परंपरा पुढे नेत आहेत. अनेक मंदिरांच्या स्वतःच्या गोशाळा आहेत.
आपले गोमातेविषयीचे हे प्रेम अजूनही टिकून आहे. भारतातील अनेक घरांमध्ये आजही महिला स्वयंपाक करतांना पहिली पोळी गायीसाठी काढतात. अनेक जण दुपारी गायीला घास खायला घातल्याखेरीज जेवत नाहीत. मग इतकी निष्ठा असूनही आपल्या देशात गोहत्या का होतात ? गोरक्षकांची आवश्यकताच का भासते ? आणि जर आपल्या आजूबाजूला अशा हत्या घडतात, तर मग आपण चिडून का उठत नाही ? जे चालले आहे, त्याविषयी साधा निषेधही का व्यक्त करत नाही ?
२. गोरक्षकाच्या हत्येची नोंद कुणी का घेतली नाही ?
शेखर रापेल्ली यांची काही दिवसांपूर्वी झालेली हत्या ही काही पहिली हत्या नव्हे. याआधीही असे अनेक प्रसंग घडले; पण आपण शांत राहिलो. असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडूनही आपण शांतच रहाणार आहोत का ? हा प्रश्न आपण एकदा स्वतःला विचारायला हवा. या प्रसंगाची एक साधी बातमीही कुठेही दाखवण्यात आली नाही किंवा त्याची चर्चा समाजमाध्यमांवरही कुणी केली नाही. खरेच गोरक्षण एवढे तुच्छ आहे का ?
३. गायींचे रक्षण होणार नसेल, तर कायदा कशासाठी ?
गायीचे जसे धार्मिक महत्त्व आहे, तसे सामाजिकही आहे. तिचे दूध पौष्टिक आहे, शेण उपयोगी आहे, गोमूत्राने तर अनेक रोग बरे होतात, हेही सिद्ध झाले आहे. तरीही कथित प्राणीमित्रांना गायीची दया का येत नाही ? श्रद्धा म्हणून नव्हे; पण किमान एक जीव म्हणून सुद्धा कुणी तिच्याकडे का बघत नाही ? रस्त्यावर फिरणार्या कुत्र्यांच्या हक्कांसाठी एखादी संस्था उभी राहू शकते; शेतीची सतत नासाडी करण्यार्या वानरांना मारल्यानंतर ज्यांनी मारले, त्यांना शिक्षा होऊ शकते, मग कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायीचे रक्षण का होऊ शकत नाही ? त्यासाठी तर कायदा सुद्धा आहे. मग तरीही त्याचे पालन का होऊ शकत नाही ? मुळात जर कायदा अस्तित्वात आहे, तर अशा प्रकारच्या गोरक्षकांची आवश्यकताच का पडते ? प्रामाणिकपणे गोसंपत्तीचे रक्षण करणार्या गोरक्षकांना सतत गुंड का ठरवले जाते ? जर यांपैकी एकाही प्रश्नावर मार्ग निघणार नसेल, तर मग अशा कायद्यांची आवश्यकताच काय ? असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ? जर अस्तित्वात असलेल्या कायद्याचा वापर योग्य तर्हेने होत नसेल, तर प्रशासन आणि सरकार यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. नाहीतर ‘यथा राजा तथा प्रजा’ अशी वेळ आपल्यावर येईल.
– कु. अन्नदा विनायक मराठे, उसगाव, तालुका दापोली, रत्नागिरी (२६.६.२०२३)