राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट : अजित पवार यांच्यासह ९ नेते सरकारमध्ये सहभागी !

• अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी : सर्वांना मंत्रीपद !

• राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवार यांचा दावा!

• छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आदींचा समावेश !

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी !

उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सत्कार स्वीकारतांना अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे २ जुलैला त्यांच्या ९ आमदारांसह नाट्यमयरित्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मारावबाबा आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या नेत्यांनीही सरकारमध्ये प्रवेश केला. या सर्व नेत्यांनाही राज्यपाल बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानी काही आमदार आणि कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली. यानंतर त्यांनी तात्काळ राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन सरकारला पाठिंबा दर्शवला. या वेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार यांची अप्रसन्नता कारणीभूत !

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या दायित्वातून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या’, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांची त्यांच्याच पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा चालू झाली.

३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिवसेना-भाजप यांना पाठिंबा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई – शिवसेना-भाजप यांच्या पाठिंब्याचा निर्णय आमच्या पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही हा पाठिंबा दिला असून भविष्यातील सर्व निवडणुकाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही लढवणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हेही उपस्थित होते.

यापुढे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे. कर्तृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिले जाते, तेव्हा अशा घटना घडतात.

‘डबल इंजिन’च्या सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे. यापुढे राज्याचा विकास ‘बुलेट ट्रेन’च्या वेगाने होईल.

अजित पवार यांनी विकासाला साथ दिली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता तातडीने होईल.

आमच्यासमवेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येचा विचार करून २-३ दिवसांत पुढील भूमिका घेऊ ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

६ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये संघटनेत पालट करण्याविषयी विचार करणार होतो; मात्र त्यापूर्वीच काही सहकार्‍यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. आम्हाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, याचे चित्र २ दिवसांत स्पष्ट होईल. येत्या २-३ दिवसांत आमच्यासमवेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येचा विचार करून पुढील भूमिका घेऊ, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार पुढे म्हणाले, काही आमदारांनी सांगितले की, आम्हाला दूरभाष करून आम्हाला माहिती न देता बोलावून घेतले आणि पाठिंब्यासाठी स्वाक्षरी घेतली. त्यांची भूमिका ते लवकरच सांगतील. आमच्या नेत्यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन या आरोपातून मुक्त करण्याचे काम भाजपने केले. २ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारमध्ये सापडलेला पक्ष असल्याचा उल्लेख केला होता. आज मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना प्रवेश देऊन त्यांच्या वक्तव्यात तथ्य नसल्याचे भाजपने दाखवून दिले. पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे आमच्यातील काही लोक अस्वस्थ होते. आरोप असलेल्या नेत्यांना सरकारमध्ये घेतल्याचा लाभ झाला. उद्या कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी बाहेर पडणार आहे. झालेल्या प्रकाराची मला चिंता नाही. वर्ष १९८० मध्ये पक्ष सोडून गेलेल्यांचा पराभव झाला, तेच चित्र पुन्हा दिसून येईल.’’

एकनाथ शिंदे अपात्र ठरणार असल्यामुळे अजित पवार यांचा पाठिंबा घ्यावा लागला ! – खासदार संजय राऊत, ठाकरे गट

सध्याचे सरकार अस्थिर असल्यामुळे सरकारला अजित पवार आणि अन्य आमदार यांचा पाठिंबा घ्यावा लागला. लवकरच एकनाथ शिंदे यांसह १६ आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे हा नवीन टेकू त्यांनी घेतला आहे.

यांतील अनेक लोक असे आहेत की, ज्यांच्या विरोधात भाजपने मोहीम राबवली होती. एकनाथ शिंदे अधिककाळ मुख्यमंत्रीपदावर रहाणार नाहीत, हे यातून स्पष्ट झाले आहे. लोकांचा याला पाठिंबा नाही.

शरद पवार यांचा पहिला चमू सत्तेच्या दिशेने मार्गस्थ झाला ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांचे ओझे उतरवायचे होते. त्याचा पहिला अंक पार पडला. शरद पवार यांचा पहिला चमू सत्तेच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. यथावकाश दुसराही सत्तेच्या सोपानासाठी रूजू होईलच, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘तसेही महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे यांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व रूचत नव्हते. त्यावर अनायसे उतारा शोधला. यामुळे देशापुढे काय चित्र उभे रहात आहे ?, तर महाराष्ट्राच्या  राजकारणाचा चिखल झाला आहे. ज्या राज्याने देशाचे प्रबोधन केले, त्या राज्याचे राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेले आहे, हे पाहून जीव तुटतो. महाराष्ट्राच्या पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे, हा विचार करून मनात धस्स् होते. महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे, याची निश्‍चिती असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच चालू रहाणार कि येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचे हे किळसवाणे राजकारण बंद पाडणार ?’’

 (सौजन्य : Hindusthan Post)