खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

उपविभागीय जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचा आदेश

प्रतिकात्मक चित्र

खांडवा (मध्यप्रदेश) – येथील ‘सेंट पॉयस सिनियर सेकेंडरी स्कूल’ या शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बकरी ईदच्या दिवशी नमाजपठण आणि ‘कलमा’ (अल्लाव्यतिरिक्त अन्य कुणीही मोठा नाही, अशा आशयाचे वाक्य) पठण करवून घेतल्याचे समोर आले आहे. विश्‍व हिंदु परिषदेने केलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी पी.एस्. सोलंकी यांनी सांगितले, ‘या संदर्भात शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.’ विहिंपनेे या शाळेची मान्यता रहित करण्याची मागणी केली आहे.

१. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, आम्ही देशातील सर्व सण साजरे करतो. (सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा ! – संपादक) या अंतर्गतच बकरी ईदचा कार्यक्रम करण्यात आला होता. प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांसमवेत बकरी ईद साजरी करण्यात येणार होती.

२. विहिंपचे जिल्हामंत्री अनिमेष जोशी यांचे म्हणणे आहे की, ही शाळा धर्मांतराच्या संदर्भात नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी शाळेमध्ये युवकांच्या संमेलनाच्या निमित्ताने ५०० हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्माची शिक्षा देण्यासाठी आणण्यात आले होते. त्या वेळी हिंदु संघटनांनी विरोध केला होता.

संपादकीय भूमिका

कॉन्व्हेंट शाळांमध्ये कधी हिंदूंचे सण साजरे केले जातात का ? ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या पाल्यांना पाठवायचे का ?’, याचा विचार हिंदु पालकांनी गांभीर्याने करणे आवश्यक !