सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।

श्री विठ्ठल

श्री विठ्ठलाच्या नावाचा व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. व्युत्पत्ती : ‘डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’

आ. अर्थ :

१. विट + ठल (स्थळ) = विठ्ठल

अर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.

२. विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति ।

अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.

इ. ‘विठ्ठल’ याचे दुसरे नाव – पांडुरंग :‘पांडुरंग हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते ‘पंढरपूर’ होय, असे डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – श्री विठ्ठल)


श्री विठ्ठलाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये !

श्री विठ्ठल

१. श्रीविष्णुतत्त्वाचे प्रमाण जास्त असणे

‘श्री विठ्ठल हा भक्तीचा भुकेला आहे’, असे म्हणतात. या देवतेत श्रीविष्णुतत्त्वाचे प्रमाण जास्त आहे.

२. स्थितीशी संबंधित देवता

विठ्ठलामध्ये स्थिरत्व भाव असल्याने तो उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी स्थितीशी संबंधित आहे.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात.)

३. भक्ताच्या हाकेला लगेच ‘ओ’ देणारी देवता

श्री विठ्ठल ही भक्ताच्या हाकेला लगेच ‘ओ’ देणारी देवता असल्याने ती पुरुषदेवता असूनही तिला भक्तगण ‘विठुमाऊली’ या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल पुष्कळ मायाळू आणि प्रेमळ अंतःकरणाचा असल्याने ‘तो भक्तांसाठी धावत येणारच’, असा भक्तांचा ठाम विश्वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठुमाऊलीने भक्तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या अन् भक्तांची सेवा केली.

४. कोणत्याही जिवाचा प्रत्यक्ष संहार न करणारी देवता

‘श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्वच भक्तगण भोळा भाव असलेले आहेत. श्री विठ्ठलाला ‘भक्ताचे रक्षण करणारी आराध्य-देवता’, असे संबोधले जाते. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करीत नाही, हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.’

– श्रीकृष्ण (एक साधिका यांच्या माध्यमातून)


श्री विठ्ठलमूर्तीची सूक्ष्म वैशिष्ट्ये !

श्री विठ्ठल

पंढरीचा विठुराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ! विठ्ठलाचे केवळ नाव घेतले, तरी भाविकांच्या हृदयात भक्तीची नवी पालवी फुटते. ज्या मूर्तीच्या दर्शनाने संतांचे ध्यान लागते, अशा विठ्ठलमूर्तीची सूक्ष्म दृष्टीला दिसलेली वैशिष्ट्ये, मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ.

श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची असूनही विठ्ठलाला ‘पांडुरंग’ (पांढर्‍या रंगाचा) का म्हणतात ?

१. शास्त्रे आणि पुराणे यांत श्री विठ्ठलाचा रंग सावळा सांगितलेला असला तरी दह्या-दुधाचा अभिषेक केल्यामुळे विठ्ठल पांढर्‍या रंगाचा झाल्याने त्याला ‘पांडुरंग’  म्हणतात. – श्रीकृष्ण (एक साधिका यांच्या माध्यमातून)

२. श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची दिसत असली, तरी खर्‍या भक्ताला सूक्ष्म दर्शनेंद्रियाने ती पांढरीच दिसते.

प्रत्येक मासातील दोन एकादशींपैकी पहिली श्री विठ्ठलाच्या नावे आणि दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

काळ्या रंगाची, अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांची, दोन्ही हात कटीवर (कमरेवर) ठेवलेली आणि विटेवर उभी, अशी श्री विठ्ठलाची मूर्ती असते. पुंडलिकाने केलेल्या आई-वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन श्री विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने श्री विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आई-वडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात श्री विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षीभावाने पहाणारा श्री विठ्ठल त्यात दाखवला आहे. कटीच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कटीवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये नियंत्रणात असलेला.   

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्रीविष्णु’)

मूर्तीचे उपासनेतील महत्त्व

१. मूर्तीत श्रीविष्णुरूपी अप्रकट तत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने ‘श्री विठ्ठल भक्तीचा भुकेला आहे’, असे म्हणतात. भक्तीनेच श्रीविष्णुरूपी उच्च तत्त्वाला जागृत करणे शक्य होते.

२. मूर्तीचे भावभक्तीस्वरूप उपासनेच्या दृष्टीने असलेले महत्त्व : ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश स्वरूप या मूर्तीत सर्वच देवतांचे तत्त्व एकवटले आहे’, असे म्हणतात; म्हणूनच कित्येक युगे ही मूर्ती सर्वांनाच स्वतःकडे आकृष्ट करायला लावणारी अन् डोळ्यांत भक्तीभावाचे अश्रू उभी करणारी ठरली आहे.

३. भक्ताच्या उत्कट भावलहरींमुळे मूर्तीच्या अंतरंगातील दोन मार्गांपैकी भक्ताच्या साधनामार्गाला अनुसरून असणारा मार्ग जागृत होऊन त्याला चैतन्याची प्राप्ती होणे : भक्तातील उत्कट भावाच्या लहरींमुळे मूर्तीतील निर्गुण अंतरंगाशी संबंधित पोकळी जागृत होऊन त्याच्या साधनामार्गाप्रमाणे प्रकृतीविषयक नागमोडी मायारूपी मार्ग किंवा शून्यमार्ग जागृत होऊन संपूर्ण मूर्तीच्या स्तरावर भक्ताला पूर्ण चैतन्याची फलप्राप्ती होते.

(संदर्भ : देवतांची उपासना : खंड ४ ‘श्री विठ्ठल’)


युगे अठ्ठावीस उभा विटेवरी !

श्री विठ्ठल

२८ युगे उभा असणे म्हणजे काय ?

१. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे.

२. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.

३. ‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’ – संकलक


श्री विठ्ठलाच्या मूर्तीची सूक्ष्म दृष्टीला दिसलेली वैशिष्ट्ये आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

१. वाळूचे कण एकत्र येऊन बनलेली स्वयंभू मूर्ती

वाळूचे कण एकत्रित येऊन हे कण श्रीविष्णूच्या स्थितीविषयक क्रियाशक्तीने बांधले गेल्याने त्यांचे घनीकरण होऊन श्री विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती बनली आहे.

२. कटीवर ठेवलेल्या दोन्ही हातांशी संबंधित शक्ती

श्री विठ्ठलाने कटीवर ठेवलेल्या हातांशी आडव्या रेषेत स्थितीविषयक श्रीविष्णूच्या प्रकट शक्तीचे एकत्रिकरण झाले आहे.

३. डाव्या हातात धरलेला शंख

हा शंख अप्रकट अशा अनाहतनादाचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील क्रियाशक्तीला सतत सृष्टीच्या कार्यात गतीमान ठेवण्यासाठी या नादाचा उपयोग केला जातो.

४. उजव्या हातातील कमळाची कळी

अ. उजव्या हातात कमळाची कळी आहे आणि तिचा देठ पाताळाशी सलगी करणारा आहे. कमळाच्या देठातून वहाणारा सूक्ष्म चैतन्यनाद पाताळातील त्रासदायक स्पंदनांना दूर फेकणारा आहे. कमळ हे आनंददायी उत्पत्तीचे दर्शक आहे. कमळाच्या कळीच्या गर्भात सुप्त असणारा दिव्य गंध संपूर्ण ब्रह्मांडातील इच्छाशक्तीतत्त्वात्मक निर्मिती-क्षमतेस जागृत करणारा आहे.

५. मूर्तीचे दोन्ही पाय पूर्णतः विटेला टेकलेले नसण्याचे कारण आणि पायांखाली असणार्‍या विटेचे महत्त्व

५ अ. मूर्ती विटेवर बहुतांशी अधांतरी असणे : श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पाय पूर्णतः विटेवर टेकलेले नाहीत, तर ही मूर्ती अधांतरी, म्हणजेच केवळ पावलांची पुढची बोटे विटेला टेकवलेल्या स्थितीत आहे.

५ आ. मूर्तीची वायूतत्त्वस्वरूप कार्य करणारी पावले : विठ्ठलाची मागून अधांतरी उचललेली पावले, हे वायूतत्त्वस्वरूप क्रियेच्या स्तरावर कार्य करण्याचे अफाट सामर्थ्य विठ्ठलात असल्याचे दर्शवतात.

५ इ. चरणांच्या मागील पोकळीतून अष्टमहा-सिद्धींची प्राप्ती होणे : चरणांच्या मागच्या बाजूची पोकळी (वीट आणि टाचेखालचा अधांतरी भाग यांमधील पोकळी) कार्यरत झाल्याने योगाभ्यासाने त्याची भक्ती करणार्‍या सर्वांनाच अष्टमहासिद्धींची प्राप्ती होऊ शकते.

५ ई. विटेचे महत्त्व : पायाखाली असणारी वीट, हे विठ्ठलाचे पृथ्वीतत्त्वावर नियंत्रण असल्याचे प्रतीक आहे. विटेवर ध्यान लावले असता देहाला कृतीशीलता प्राप्त होते.

६. मूर्तीची अन्य वैशिष्ट्ये

६ अ. काळा रंग : मूर्तीचा रंग काळा असल्याने तो शिवस्वरूप पुरुषप्रधान प्रकृतीशी संबंधित आहे, तर अंतरंग हे पांढर्‍या रंगाशी संबंधित असून ते निर्गुणाधिष्ठित मंडलाने व्याप्त झालेले आहे.

६ आ. अधोदृष्टी : श्री विठ्ठलाची अधोदृष्टी ही त्याच्या नाभीकमलातील पोकळीशी ध्यान लावणारी असून तिच्यातून निघणार्‍या परावाणीस्वरूप नादातील चैतन्याने सर्व ब्रह्मांडाला विराटभावात चैतन्याचा अविरत पुरवठा करणारी आहे.

६ इ. विशाल भालप्रदेश (कपाळ) : मूर्तीचा विशाल भालप्रदेश आज्ञाचक्रातून तेजाची उधळण करणारा असून तो शिवस्वरूपी आहे.

६ ई. गळ्यातील कौस्तुभ मणी : हा क्रियेच्या स्तरावर पिंडाच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. या मण्यात विद्यादायी श्री सरस्वतीचा वास आहे.

६ उ. श्री विठ्ठलाच्या दोन्ही कानांजवळ वायुपुत्र हनुमानाचा दास्यभावात सूक्ष्म वास आहे.

६ ऊ. मस्तकावर विराजमान असलेली शिवपिंडी : ही स्वयं ब्रह्मस्वरूप शिवतत्त्वाची अद्वैतात अनुभूती देणार्‍या निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे.

६ ए. मूर्तीच्या पायांच्या मध्ये असलेली काठी आणि तिची वैशिष्ट्ये

१. श्री विठ्ठलाच्या पायांच्या मध्ये असलेली काठी ही श्रीकृष्णस्वरूप पूर्णत्वरूपी कार्याचे प्रतीक आहे.

२. ती अखिल ब्रह्मांडाचा शक्तीच्या स्तरावर तोल सांभाळणारी असल्याने सप्तलोक आणि सप्तपाताळ यांचा ती मेरूदंड समजली जाते.

३. तिचा सप्तपाताळाशी संबंध असून ती मारक तत्त्वाच्या साहाय्याने पाताळातील त्रासदायक स्पंदनांना नियंत्रित करणारी आहे.

६ ऐ. मूर्तीच्या छातीवरील श्रीवत्सलांच्छनात्मक चिन्ह : हे चिन्ह अनाहतचक्राशी संबंधित भावऊर्जात्मक निळ्या लहरींची ब्रह्मांडात उधळण करणारे असून या मूर्तीच्या सान्निध्यात आल्यावर प्रत्येक भक्ताची या लहरींच्या साहाय्याने भावजागृती झाल्याविना रहात नाही.

६ ओ.  श्री विठ्ठलाच्या कटीप्रदेशाखालील भाग ब्रह्मास्वरूपी, तर कटीपासून वर मानेपर्यंतचा भाग श्रीविष्णुरूपी आणि मस्तकाचा भाग शिवस्वरूपी आहे.

२ अ ७. श्रीविष्णुलोकात शून्यमार्गाने पोहोचवणारी मूर्ती : श्री विठ्ठलाची मूर्ती स्थितीवाचक भावात इच्छा, क्रिया आणि ज्ञान या स्तरांवर साम्यभावात कार्य करणारी असल्याने ‘श्रीविष्णुलोकात शून्यमार्गाने पोहोचवणारी दैवी मूर्ती’, असा तिचा उल्लेख केला जातो.

२ अ ८. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाह्य मंडलात अनेक दैवी मंडलांचा, तसेच विविध तत्त्वस्वरूप आकर्षणशक्तीयुक्त शक्तींचा वास असणे

अ. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाह्यमंडलात नवग्रह-मंडले, तारकामंडले आणि नक्षत्रमंडले, तसेच मातृका अन् ब्रह्मादी मंडले सुप्त रूपात वास करत असल्याने कोणत्याही स्वरूपाची याचना केल्यास ही मूर्ती सगुण स्वरूपात त्याची तात्काळ अनुभूती देणारी ठरणारी आहे.

आ.  मूर्तीच्या समोरच्या भागात सगुण इच्छाशक्तीरूपी, उजव्या भागात सगुण-निर्गुण मारक तत्त्वस्वरूप क्रियाशक्तीरूपी, डावीकडील भागात निर्गुण-सगुण तारक तत्त्वस्वरूप क्रियाशक्तीरूपी आणि मागच्या भागात निर्गुण तारक स्वरूप ज्ञानशक्तीरूपी आकर्षणशक्तीचा वास आहे.

२ अ ९. मूर्तीच्या अंतरंगाची वैशिष्ट्ये

२ अ ९ अ. अनंत ब्रह्मांडे असणे : मूर्तीमध्ये आतून आरपार पोकळी असून या पोकळीत अनंत ब्रह्मांडे पांढर्‍या अप्रकट प्रकाशाच्या रूपात सामावलेली आहेत.

२ अ ९ आ. दिव्य दृष्टीने बघायला गेल्यास ही मूर्ती संपूर्णतः निर्गुण, म्हणजेच पांढरी दिसते.

२ अ ९ इ. विठ्ठलमूर्ती विशालस्वरूप व्यापकभावात पारदर्शक रूपात कार्य करत असल्याने तिचे जडत्वदर्शक आकारभान भक्तांना सगुण अनुभूती देण्यापुरतेच आहे.

२ अ ९ ई. मूर्तीत सामावलेले मायारूपी प्रकृतीदर्शक मार्ग, तसेच निवृत्तीरूपी शून्यमार्ग अन् त्यांची वैशिष्ट्ये : श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पोकळीत त्याच्या उभ्या मध्य-रेषेवर दोन मार्ग आहेत. एक माया मार्ग, हा प्रकृतीदर्शक आहे, तर दुसरा शून्य मार्ग, हा निवृत्तीदर्शक आहे.

२ अ ९ उ. मूर्ती साक्षीभावात्मक स्वरूपात असण्याचे कारण : मूर्तीत असणार्‍या या दोन प्रकाशमान मार्गांविना कुठेही आत प्रकाशमान पोकळ्या नाहीत. मूर्तीत प्रकाशरहित पोकळ्यांचेच प्रमाण जास्त असल्याने या मूर्तीला ‘साक्षीभावात्मक मूर्ती’, असे नाव दिलेले आहे.

२ अ १०. विठ्ठलमूर्तीचे प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्याचे प्रमाण अत्यल्प असून निर्गुण स्वरूपात कार्यात बल पुरवण्याचे प्रमाण जास्त आहे.

२ अ ११. श्री विठ्ठलाची मूर्ती सर्वच स्तरांवरील उपासकांना लाभदायक असण्याचे कारण : मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्‍यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.

२ अ १२. श्री विठ्ठलाची मूर्ती दैवी प्रीतीचा अथांग सागर असल्याने तिने आजवर अनेक संतांच्या अपार भक्तीला आपल्या हृदयात स्थान दिलेले असणे : या मूर्तीची दैवी वैशिष्ट्ये आणि मूर्तीविज्ञानात्मक आध्यात्मिक दृष्टीकोन अलौकिक आहेत; म्हणून बर्‍याच भक्तीमार्गी संतांनी या मूर्तीवर अतूट प्रेम केलेले आढळते; कारण ही मूर्ती म्हणजेच दैवी प्रीतीचा अथांग सागर आहे. या मूर्तीने आजवर अनेक संतांच्या अपार भक्तीला आपल्या हृदयात स्थान दिलेले असल्याने ही मूर्ती ‘करुणाकर’ म्हणून संपूर्ण विश्वात मान्यता पावलेली आहे.

सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ।। – जगद्गुरु तुकाराम महाराज