केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !

चाबूक आणि काठ्या यांचे दिले जातात फटके !

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) – केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा आता पूर्ण होत आला आहे. अशातच यात्रेमध्ये खेचरांकडून (‘खेचर’ म्हणजे गाढव आणि घोडी यांच्या संयोगाने उत्पन्न झालेला प्राणी !) अधिकाधिक काम करून घेण्यासाठी त्यांना  बळजोरीने अमली पदार्थ प्यायला दिले जात आहेत. तसेच चाबूक आणि काठी यांनी मारून काम करण्यासाठी उभे केले जात आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे, याची निश्‍चिती झालेली नसली, तरी रुद्रप्रयाग पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

इन्स्टाग्रामवरून प्रसारित झालेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी खेचरांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला आहे. एका व्यक्तीने यासंदर्भात म्हटले की, अनेक खेचर आणि घोडे यांच्याकडून त्यांच्या अंतिम श्‍वासापर्यंत काम करवून घेतले जाते. त्यांना चाबकाने मारले जाते, तसेच अमली पदार्थ पाजण्यात येतात. यंदा यात्रा चालू झाल्यावर पहिल्या २० दिवसांतच ६० हून अधिक खेचरांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रस्त्यावरच सोडून दिले गेले. प्रचंड ओझ्यामुळे त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा प्रकारे जर केदारनाथाचे दर्शन घेतले, तर ते भगवंताला आवडणार आहे का ? जर तुम्हाला (भाविकांना) चालत वर जाता येत नसेल, तर तुम्ही घरी राहूनच दर्शन घ्या ! अशा प्रकारे खेचरांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ नका !

संपादकीय भूमिका

केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !