वायनाड (केरळ) येथील तिरुनेल्ली महाविष्णु मंदिरात चालू असलेले बांधकाम अवैध !

  • केरळ सरकारच्या मलबार देवस्वम् बोर्डाच्या अखत्यारीतील मंदिरात अपव्यवहार !

  • केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण

  • बांधकाम त्वरित थांबवण्याचा आदेश !

  • हिंदु भाविकांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेमुळे कारवाई !

वायनाड (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील मलबार देवस्वम् बोर्डाच्या अंतर्गत येणार्‍या तिरुनेल्ली महाविष्णु मंदिरातील बांधकामाच्या कामात अनेक अनियमितता आढळल्यावरून ताशेरे ओढले. केरळ सरकार आणि मलबार देवस्वम् बोर्ड हे मंदिरामध्ये अवैध बांधकाम करत असल्याचा अहवाल न्यायालयासमोर मांडण्यात आला. त्यावरून न्यायालयाने मंदिरातील सर्व बांधकाम तातडीने थांबवण्याचा आदेश दिला आहे.
स्थानिक हिंदु भक्तांनी बांधकामातील त्रुटी लक्षात आणून देण्यासाठी न्यायालयात काही कालावधीपूर्वी याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेवरून उच्च न्यायलयाने एम्.आर्. अरुणकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली होती. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हिंदूंच्या प्रयत्नांना यश आले आहे.

आयोगाने केलेल्या निरीक्षणांमध्ये पुढील गोष्टी आढळल्या :

१. या मंदिरातील पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक ठिकाणांना नष्ट करण्यात आले आहे.

२. प्रसाधनगृह आणि शौचालये, तसेच ‘सेप्टिक टँक’ यांचे बांधकाम शेजारील पवित्र ‘पापनाशिनी नदी’च्या काठावर करण्यात आले आहे. यामुळे सांडपाणी हे नदीमध्ये, तसेच मंदिराच्या ‘पंचतीर्थकुलम्’ यामध्ये मिसळण्याची शक्यता आहे.

३. नदीला अडवून जेसीबीद्वारे तेथील नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भागांची माती काढली जात आहे. यामुळे भूस्खलनाचे संकट उभारू शकते.

४. बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या निधीचा अपवापर होत असल्याचे आढळले आहे.

५. ‘विलक्कू’ नावाची एक प्राचीन रचना आवश्यक नसतांनाही पाडण्यात आली आहे.

६. जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून पवित्र जल थेट मंदिरात आणण्यासाठी केलेली शेकडो वर्षे प्राचीन ‘थिडापल्ली’ ही व्यवस्था नष्ट करण्यात आली आहे. यामुळे पाण्याला वाट करून देणारे बांधकाम नष्ट झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्राचीन परंपराच नष्ट झाली आहे.

७. बोर्डाच्या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची शिफारसही या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केरळमधील सर्वच मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आणि याआधीही विविध घटनांत वेगवेगळ्या देवस्वम् बोर्डांतील भ्रष्टाचार उघड झाल्याने या बोर्डांना रहित करण्यासाठीच आता हिंदूंनी आवाज उठवायला हवा !